“ ए बेवड्या , ऊठ. तुझ्या कडे कोणी तरी आलेय..”

विकी ने मारलेली ही तिसरी का चौथी हाक… सुरवात ‘ओ अंकल..’ ने झाली आणि मग ‘ए थेरड्या’ आणि आता शेवटी ‘ए बेवड्या’! विकीचे तरी काय चुक आहे म्हणा.. हो मी थेरडा आहे, मी बेवडा आहे …या दोन्हीं शिवाय मी आणखी काहीच नाही हेच खरे. विकीने दाखवून दिले ना मी कोण आहे!

कसाबसा उठून उभा राहीलो, अंगात कसलेच त्राण नव्हते, गेले दोन दिवस पोटात अन्नाचा कण नाही की दारुचा एक थेंब, कसे त्राण राहणार अंगात.खुरडत खुरडत जात दरवाजा उघडला, बाहेरचा उजेड भसकन आत शिरला.. डोळे त्या प्रकाशाने बधीर झाले ..दोन क्षण काहीच दिसले नाही… हळू हळू विकी दिसला आणि त्याच्या मागे ..डॉ.देशमाने!

“डॉक्टर साहेब आत या ना”

“नको , बाहेरच ठीक आहे”

“ठीक आहे, पण आज कशी काय आठवण काढलीत माझी?”

डॉ.देशमाने जरासे पुढे झाले, त्यांच्या हातात एक जीर्ण झालेली वही होती … मला काही कळलेच नाही.

“हे तुम्हाला द्यायला आलोय”

जबरदस्त कंप असलेला माझा हात अभावितच पुढे झाला, दोन दिवस दारु नाही हात असा थरथरणार नाही तर काय होणार!

त्या अंधारत काय दिसणार म्हणा …

“काय आहे हे ?”

“तुम्हाला मिसेस. सुमित्रा सरदेसाईं माहीती असतील ना?”

देशमान्या अरे जिच्या आठवणींच्या चितेवर सारे आयुष्य जळत आहे , ती माझी सुमित्रा मला माहीती नाही?..

“हो”

“तर त्यानी ही वही आपल्याला द्यायला सांगीतली आहे”

“मला? “

“हो, त्यांची शेवटची इच्छा होती तशी”

“शेवटची इच्छा ?”

माझ्या चेहेयावरचे प्रश्नार्थक भाव ओळखून डॉ.देशमाने म्हणाले ..

“मागच्या महिन्यात सुमित्रा सरदेसायांचे दु:खद निधन झाले, अगदी अचानक , हार्ट अ‍ॅटॅक ने कसलीही कल्पना नसताना, तसे छातीत दुखायचे अशी तक्रार होती त्यांची पण इतके टोकाचे दुखणे असेल याची कल्पना आली नाही. शेवट्चे काही दिवस आय.सी.यु. मध्ये होत्या. शेवट पर्यंत बोलत होत्या.. तुमची आठवण काढली, तुम्हाला एकदा भेटायचे म्हणत होत्या. मिस्टर सरदेसाईंनी तुम्हाला बोलवायला कोणाला तरी पाठवले होते पण आपण बेहोशीत होतात त्यावेळी.. ही वही तुम्हाला द्यायला सांगीतली होती ”

सुमित्रा गेली … सुमित्रा गेली… सुमित्रा गेली… कसे शक्य आहे?…..

देशमाने निघून गेले, देशमान्यांनी दिलेल्या पाकीटात एक वही आहे , पैसे नाहीत हे कळताच विकी केव्हाच पसार झाला होता..

खोलीच्या दाराच्या चौकटीत उजेडाची एक तिरीप येत होती , थरथरत्या हाताने सुमित्राची ती वही उघडली…  रमाकांत ‘…’रमाकांत’… रमाकांत’ माझेच नाव कित्ती वेळा त्या वहीच्या शेवटच्या पाना वर लिहलेले दिसत होते… कोपर्‍यात एक नाजूक ‘हार्ट’! छातीत जबरदस्त कळ आली …

…………

“यांचे कोणी वारस वगैरे?”  सब इन्स्पेक्टर पाटलांनी डोळ्यावरचा गॉगल बाजूला करत विचारले…

“नाही त्यांचे कोणी नाही.. यांच्याकडे अ‍ॅडव्होकेट कामत म्हणून एक जण नेहमी यायचे, त्यांना कदाचित जास्त माहीती असेल…” चाळीचे सेक्रेटरी …

“ठीक आहे , ४२५१ , बॉडी पोष्ट मार्टेम ला पाठवा आणि ते कोण कामत आहेत त्यांना बोलावून घ्या ..”

……

समाप्त

 

ही कथा काही कारण नसताना  रेंगाळली ,  का? कोणास ठाऊक! पण आज ती पूर्ण केली आहे.. वाचकांना संदर्भ लागणे सोपे जावे म्हणून ह्या कथेचे आधी प्रकाशीत झालेले पाचही भाग आणि आजचा शेवटचा भाग असे सर्व भाग एकत्रित पणे पी.डी.एफ. स्वरुपात आपल्याला उपलब्ध करुन देत आहे,  ज्यांना हे भाग पुन्हा मुळातूनच वाचावयाचे आहे (तसे ते वाचा , त्यातल्या सुंदर चित्रां साठी !) त्यांच्या साठी , त्या मागच्या सर्व भागांच्या लिंक्स..

 

ती गेली तेव्हा… (भाग – १)

 

ती गेली तेव्हा… (भाग – २)

 

ती गेली तेव्हा… (भाग – ३)

 

ती गेली तेव्हा… (भाग – ४)

 

ती गेली तेव्हा… (भाग – ५)

 

हे सर्व भाग एकत्रित…


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *