…………………………………..

कोणी तरी दार ठोठावतेय… साला हे लोक बेल का वाजवत नाहीत… अरे हो पण बेल कशी वाजेल लाइट्चे बील भरले नाही म्हणून लाईट तोडले नाहीत का ? जाऊदे , इथे कोणाला पाहीजेत लाईट ? आताशा अंधाराचीच सवय जास्त आहे मला. मिट्ट अंधारातही ग्लासात दारु बरोबर भरता येते .. हा, तेव्ह्ढे जजमेंट आहे बरे का आपल्याला!

पण संध्याकाळी , दिवेलागणीला , थोडा वेळ तरी घरात लाईट असावा नाही का, ती असती तर तिने निरांजन लावले असते … जाऊ दे.. कशाला आता ते … त्याचा काय उपयोग आहे म्हणा…

पण साला इतका वेळ दार कोण ठोठावतेय.. नक्कीच तो देसायांचा विकी असणार … काल आणून दिलेल्या खंब्याचे पैसे मागायला आला असणार.. कोठून देऊ त्याला पैसे … आणि रोज रोज नवीन कारणें तरी कोणती सांगू.

…………………………………..

हो, हाच की तो बंगला , ‘हनीकोंब’ , साला काहीच्या काही नावे देतात घराला..

पोर्च मध्ये दारा जवळच गुलाब फुलला होता.. मस्त … मी तिला गुलाबच भेट दिला होता वर  ’गुलाब गुलाबा कडे..’ असे काहीसे म्हणालो ही होतो .. साला नेमके शब्द विसरलो आत्ता .. पण ती तेव्हा लाजल्याचे आठवतेय .. किती गोड होते ते… तिचे हे असे लाजणे पुन्हा कधी बघायलाच मिळाले नाही… नंतर तो रेडा आला ना तिच्या आयुष्यात.. धरला हात आणि गेली पळून .. मी काय मेलो होतो की काय … पण तो रेडा तिला इतका का आवडावा ? जाऊ दे नशीब असते एकेकाचे..

दारावर नक्षीदार पाटी होती ’श्री व सौ …” पुढचे वाचवलेच नाही. माझ्या दारा वर अशी पाटी का नाही लागली … कशी लागणार ? ‘श्री’ म्हणवून घ्यायला मी काय असे दिवे लावतेत म्हणा आणि ‘सौ’ तर आयुष्यात आलीच नाही.. मग कशाची पाटी लावणार, आणि मुळात पाटी लावायला स्वत:चे घर असावे लागते ना ? जाऊ दे… ह्याच्यावर विचार करायचा नाही असे ठरवलेयना एकदा.. ठरलं म्हणजे ठरलं….

बेल वाजवली… मस्त चर्च बेल्स सारखा धिरगंभीर आवाज झाला ..छान … ही तिचीच निवड दिसते नाहीतर त्या डुक्करा कडे कसली रसीकता ? मला माहीतेय ना , तेव्हा काय सुंदर मॅचींग करायची .. साड्यांचे डिझाईन म्हणू नका, पोत म्हणू नका, रंग म्हणू नका.. सारे कसे नाजुक, झुळझुळीत , केसात माळलेले एकच एक फूल , पण किती तजेलदार आणि कोमल… उच्च अभिरुची! …मग असे असताना सुद्धा एक पाणघोडा का पसंत केला तिने ? जाऊ दे नशीब असते एकेकाचे..

आतुन पावलांचा आवाज आला , कोणी तरी दरवाजा उघडायला येत होते.. डायनासोर च्या पावलांचा आवाज यावा तसा धप्प धप्प आवाज येत होता .. नक्की तो टोणगाच येत असणारा दरवाजा उघडायला. तिच्या पावलांचा असा आवाज येईल का कधी ? मला माहीती नाही का ? कित्ती वेळा माझ्या काळजाच्या पायघड्यां वरुन चालत गेली असेल ती… एकेक अनुभव अस्सा उराशी कवटाळून बसलोय.. कसे विसरणार..

त्या रासवट , केसाळ जनावराने दरवाजा उघडला … माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले..

“मी , नाडकर्णी”

सुमित्रा म्हणणार होतो पण त्या अस्वलाकडे बघून जीभ चावली व म्हणालो..

“सुमित्राताईंना भेटायचे होते, म्हणजे तसे आमचे फोन वर बोलणे झाले होते गेल्या आठवड्यात , त्यांनीच आज मला भेटायला बोलावले आहे..”

“ओ , आय सी, म्हणजे तुम्हीच ते नाडकर्णी.. सुम्मी काल मला म्हणाली होती..”

’सुम्मी’? हा खोकड तिला सुम्मी म्हणतोय … तीला सुम्मी म्हणायचा हक्क माझा होता ना , मग मी ‘सुमित्राताई ‘ का म्हणालो… जाऊ दे नशीब असते एकेकाचे..

व्हिस्की ! त्या बोकडाने कितीही माऊथ वॉश मारला असला तरी व्हिस्कीचा दर्प असा थोडाच लपणार … आणि तो ही माझ्या सारख्या अट्ट्ल बेवड्या नाडकर्ण्या पासून ? अरे बोलताना तोंडाला वास आला तर तीला काय वाटेल म्हणून मी कालचा पूर्ण दिवस थेंबाला सुद्धा स्पर्श केला नाही रे…गेल्या तीस वर्षातला माझा एकमेव ड्राय डे ..

मग हे असले केसाळ धूड आणि जोडीला व्हिस्कीचा भपकारा.. सुमित्राला हे कसे चालते ? चालवून घेत असणार बिच्चारी.. मी किती सुखात ठेवली असती तीला…..

“या ना आत , बसा , मी बोलावतो सुम्मीला… सुम्मी डार्लिंग … युवर गेस्ट .. काय नाव म्हणालात तुमचे … ओ गॉट ईट … नाडकर्णी … राईट ? … हनी , मिस्टर नाडकर्णी आलेत तुला भेटायला”

सुम्मी काय , डार्लिंग काय आणि वर हनी… साल्या एखादा ढेकूण चिरडावा तसे तुला चिरडावेसे वाटते रे घुबडा… पण ते शक्य नाही … सुमित्राला, नाही नाही सुम्मी ला काय वाटेल…

(क्रमश:)


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

3 प्रतिक्रिया

///////////////
 1. Gaurav Borade

  चांगली आहे सुरुवात … पुढील भागाच्या प्रतीक्षेत.. 🙂
  एक सुचवावेसे वाटते (आग्रह नाही).. हा लेख मायबोली वर पोस्ट करून बघा ..

  0

  1. सुहास गोखले

   श्री. गौरवजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.. ‘मायबोली’ वर टाका म्हणताय … चालेल … पहिले सर्व भाग इथे प्रसिद्ध करतो… आत्ता पर्यंत पाच सहा भाग लिहून तयार आहेत … कोलाज किंवा काहीसे स्पायरल विदीन स्पायरल पद्धतीने लिहीत असलेल्या या कथेचा आवाका एव्हढा मोठा आहे / करता येईल की, पन्नास का शंभर भाग सुद्धा आरामात लिहता येतील … लिहणाराच कंटाळेल.. किंवा वाचाणारेच पळून जातील… पण तरीही आपण वाचत रहावे .. असेच अभिप्रया देत राहावे…

   सुहास गोखले

   0

 2. Gaurav Borade

  अरे व्वा भारी आहे.. मजा येईल वाचताना… पुढील लेखनास शुभेच्छा..

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *