आता हे काय आणखी नविन खुळ ? कॉकटेल झाले , बाबजींचे अद्भूत किस्से चालू आहेत , आता चक्क ‘गुलाबी बुडबुडा’ ! ही काय रहस्य मालीका सुरु करताय का काय ? ( भाऊ , हे काय चाललयं म्हणायचे ? कोठे नेऊन ठेवलेत ज्योतिषाला !)
असू दे हो , हो सारखे ज्योतिष एके ज्योतिष करुन कंटाळा आला की जरा असले काहीतरी (चमचमीत ?) असावे , बरे असते तब्बेतीला काय?
असो.
आज मी तुम्हाला एक नुस्का सांगणार आहे , हा नुस्का मी बरेच वेळा वापरला आहे , दुसर्यांना सांगीतला आहे आणि आम्हां सगळ्यांना ह्या नुस्क्याचा लाभ झाला आहे ! आपल्याला ही लाभ व्हावा असे मनापासून वाटले म्हणून जरा वाकडी वाट करुन हा नुस्का सांग़तोय… प्रयत्न करुन बघा … झाला तर लाभच होईल , नुकसान तर नक्कीच होणार नाही .
चला तर मग, जाणून घेऊया हा ‘गुलाबी बुडबूड्याचा’ नुस्का !
तसे हे रहस्य वगैरे काही नाही हो, मी उगाच ‘हवा’ करुन ठेवली आहे झाले ! हा एक ध्यानधारणेचाच प्रकार आहे . इतर ध्यान पद्धती मध्ये या ध्यानाच्या प्रकारात एक मोठा फरक आहे तो म्हणजे हे एक खास हेतू मनात ठेऊन केलेले ध्यान आहे.
हा नुस्का मुळात सुश्री शक्ती गवैन यांनी त्यांच्या ‘क्रिएटीव्ह व्हीज्युएलायजेशन’ या पुस्तकात वर्णन केला आहे . मी हे पुस्तक फार पूर्वी वाचले आहे, त्यात असे अनेक नुस्के दिलेले आहेत .
एक मजा म्हणून , उत्सुकता म्हणून मी त्यातल्या काही नुस्क्यांचा वापर करुन बघितला , काहींचा लाभ झाला , काहींचा नाही …
पण एक निश्चित सांगतो, नुकसान मात्र कधीच झाले नाही, त्या दृष्टीने हे नुस्के सुरक्षित आहेत.
यात गुढ , गंभीर , अमानवी , तांत्रीक असे काही नाही. ( गुढ , गंभीर , अमानवी , तांत्रीक वाले नुस्के मी इतरत्र वाचले व चक्क करुन पाहीले आहेत … विस्मयकारक , चित्तथरारक अनुभव पण घेतले आहेत . त्याबद्दल नंतर कधी तरी लिहायचे आहे , आत्ता नाही ! )
पद्धत अगदी साधी – सरळ – सोपी आहे , कोणालाही जमेल … यात धार्मिक असे काही नसल्याने कोणत्याही वयाच्या, धर्माच्या व्यक्तीला हे करता येईल.
तर मग घेताय ना लिहून ‘साहित्य आणि कृती’ !
साहीत्य:
तुम्ही स्वत: (अंगावरच्या सैलसर कपड्यां सहीत)
एक निवांत जागा / कोपरा
खुर्ची (जर जमिनीवर मांडी घालून बसायला त्रास होत असेल तर ) किंवा बुडाखाली घ्यायला पातळ उशी
बाहेरच्या आवाजाचा ( ‘शांताबाय’, ‘शिट्टी वाजली..’ किंवा ‘आवाज वाढव डी.जे.’…. हो हो तो ‘वाट बघणारा रिक्षावाला’ रायलाच की …. स्वारी बर्का ) त्रास कमी करण्या साठी आवश्यकते नुसार कानात घालायचे कापसाचे बोळे
प्रखर उजेड डोळे बंद असले तरी त्रास देऊ शकतो म्हणून आवश्यकता वाटल्यास डोळ्यावर बांधायची पट्टी (याला ‘आय शेड ‘ म्हणतात , एके काळी विमान प्रवासात ही फुकट मिळत असे हल्ली चिंगुशपणा करुन देत नाहीत, पण प्रवासाची साधने – ब्यॅगा इ मिळणार्या दुकानात ही विकत मिळते , पण म्हणून लगेच दुकानात धाव घेऊ नका, एक साधी जाडसर मऊ कापडाची पट्टी – आंधळी कोशींबीर खेळताना वापरतात बघा तश्शी … आपण वापरु शकता )
वेळ:
तुम्हाला सोयीची कोणतीही पण शक्यतो पहाटे (झोपे तुन जाग आल्या आल्या क्षणी.) किंवा रात्र (अगदी डोल्यावर झोप आलेली असता, कधी एकदा बिछान्यावर अंग टाकतोय असे वाटत असते ती वेळ)
पूर्वतयारी:
काही खास नाही , पण हा नुस्का अमलात आणताना , पोट हलके (रिकामे) असणे जास्त चांगले. रात्री हा नुस्का करणार असल्यास रात्रीच्या जेवणा नंतर सुमारे दीड -दोन तासानंतर करावा.
नुस्का अंमलात आणण्यापूर्वी काही तास तरी आधी कोणत्याही प्रकाराच्या मादक पेयांचे सेवन किंवा चैतन्य कांडी , चैतन्य चूर्णाचा वापर तसेच अंमली पदार्थ (तुम्हाला माहीती आहेतच!) सेवन केलेला असता कामा नये.
(या एका अटी मुळे कितीतरी लोक या नुस्क्याचा लाभ घेऊ शकलेले नाहीत !)
डास , ढेकूण आणि बायको यांचा उपद्रव नसावा.
वेळ आणि जागा निवडताना जास्तीतजास्त शांत , निवांत जागा असेल असे बघा ..
(एकाने ‘कमोड वर बसून केले तर चालेल का असे विचारले होते … त्याचे ही खरे आहे म्हणा … मुंबई सारख्या ठिकाणी याहून दुसरी शांत, निवांत जागा दुसरी कोणती मिळणार ?)
कृती:
एव्हाना तुम्ही साहित्या ची जुळवाजुळव केली असेल हे गृहीत धरले आहे.
आपल्या ठरवलेल्या जागी आणि वेळी , या पैकी एक करा:
मांडी घालोनी बैसावे ! पद्मासन घालून बसता येत असेल तर उत्तमच पण जमत नसेल तर सोसासोसाने ते करण्याच्या मागे लागू नका . साधी मांडी घालून बसायचे वांधे असतात बर्याच जणांचे , पद्मासन काय घेऊन बसलात ! मांडी घालून बसणे फारसे सुखदायक होत नसेल तर सरळ पाय पुढे सरळ पसरुन बसा , चालते !
बसताना बुडाखाली पातळ उशी मात्र जरुर घ्या , आरामदायी तर होतेच शिवाय गुडघ्यांची कुरकुर न होता जास्त वेळ बसता येते.
वज्रासन ! हो चालेल , हा पण चांगला मार्ग आहे , पण बुडा खाली पातळ उशी वज्रासनातही घ्या , लाभ होणारच.
मांडी घालून कसले बसतोय .. सगळेच वांधे आहेत… असू द्यात हो, त्याने काही बिघडत नाही .. तुम्ही खुर्चीत बसा पाव्हणं !! पण खुर्ची ला सरळ उंच पाठ असेल असे बघा. शक्य झाले तर हात नसलेली खुर्ची वापरा . निलकमल , समृद्धी यांच्या तशा खुर्च्या बाजारात उपलब्ध आहेत. पाठ सरळ असणे जास्त महत्वाचे , फार आरामदायक , मागे झुकलेली पाठ नसेल असे बघा.
त्यापेक्षा सरळ झोपले तर चालेल काय ? का नाही, तसेही चालेल , पण बर्याच वेळा अशा अवस्थेत झोप लागून जाते , नुस्का राहतो बाजूलाच , तेव्हा शक्यतो बसूनच (मांडी घालून किंवा खुर्चीत ) हा नुस्का करावा.
ते मृगाजीन , तृणासन, गजचर्म लागत नाही का? हॅट… असले काही लागत नाही… निघाले लगेच हरणाची शिकार करायला..
उदबत्ती , धूप ? काही ही नको, त्याने उलट तुम्हाला त्रास होईल.
मंद संगीत ? खिक्क !
काही प्रार्थना , मंत्र, आवाहन , जप: ह्या आपल्या नुस्क्यात असले काही नाय… मै और मेरी तनहाई … स्वारी …
मी आणि माझा नुस्का ..हवे कशाला बापू , बाप्पा !
तर मंडळी आसनस्थ झालात का? ठीक आहे … आता दुसरा टप्पा..
मंडळी, असे आसनस्थ झालात की लगेच डोळे मिटून घ्या … ज्यांना आयशेड , कानात घालायचे कापसाचे बोळे असली आयुधे वापरायाची ती वापरा .. पण आता एक करा … एकदा का आसनस्थ झालात की कसलीही हालचाल करायची नाही, कसलीही चुळबुळ करायची नाही, इकडे खाजव , तिकडे खाजव, हातपाय हलव , बूड हलव असे काहीही करायचे नाही, अगदी शहाण्या मुला सारखे गप्प बसायचे..
नुस्का सुरु झालाय ..
आता तीन वेळा ( किंवा तुम्हाला कंटाळा येई पर्यंत कितीही वेळा !) दिर्घ श्वास घ्या आणि सोडा.. हल्लू ह्ल्लू श्वास घ्यायचाय आणि तितकाच हल्लू हल्लू श्वास सोडायचाय हे लक्षात ठेवा , उगाच लोहाराच्या भात्या सारखे हाप हुप्प करु नका. जितके हळू , तब्बेतीत कराल तितका चांगला ‘इफेक्ट’ ! (काही जणांना ‘ऑन द रॉक्स’ , “बॉटम्स अप’ ची सवय असते , पण ते इथे नाही.. दुसरी कडे !)
आता तुमचा श्वास बर्यापैकी संथ आणि नियमित व्हायला सुरवात होईल, नसेल तर ‘रिपिट’ !
नुस्का सुरु की गं झाला त्याची तंत्रे किती बाई
श्वास ह्ल्लू ह्ल्लू येई … श्वास हल्लु हल्लु जाई..
आता आपल्याला आपले अंग (बॉडी म्हणा ना , लगेच समजतंय !) शिथिल करायचीच.
“आता हे शिथिल म्हणजे काय ? ”
“रिलॅक्स रिलॅक्स .. शिथिल म्हणजे रिलॅक्स , पाव्हणं !”
“आता हे रिलॅक्स कसे जमवायचे हो मास्तर ? ”
“रिलॅक्स म्हणजे बघा , ते काचेच्या ग्लास मधल्या सोनेरी चैतन्य द्रवाचे काही घुटके घेतल्यावर कसे हलके हलके वाटते ना तेच !”
“आम्ही त्यातले नाही हो मास्तर !”
“अरर्र रॉग नंबर लागला म्हणायचा ! बरे , रिलॅक्स म्हणजे खूप हलके हलके वाटणे , मनावरचा , शरीरावरचा ताण कमी झाल्यावर ही अवस्था येते … सकाळी ‘साफ’ झाली की कसे हलके, उल्हसीत वाटते तसे…”
“मास्तर आले घ्येनात … पण खुर्चीत बसून / झोपुन (आणि चैतन्य पेय न घेता !) हे कसे जमवायचे .. जरा विस्कटून सांगा ना…”
असे करा… बसलेल्या / झोपलेल्या अवस्थेत (डोळे , कान बंद बर्का) , पायाच्या अंगठ्या पासुन सुरवात करत पार अगदी डोक्या वरच्या केसां पर्यंत (डोक्यावर केस नसल्यास कपाळा पर्यंत !) तुम्हाला जेव्ह्ढे म्हणून अवयव (तुमचेच !) सापडतील त्या सर्व अवयवांवर क्रमाक्रमाने लक्ष द्यायचे आणि मनातल्या मनात कल्पना करायची की तो स्पेअर पार्ट (अवयव !) शिथील झालाय , त्याच्या वरचा सगळा ताण निघून गेलाय. उदाहरणच घ्यायचे तर:
“माझ्या उजव्या पायाचा अंगठा आता शिथिल होतोय , त्याच्यावरचा सगळा ताण निघून जात आहे, स्नायू सैल झालेत… अंगठा जड झालाय , इतका की तो आता हलवता येत नाही..”
आले ध्येनात … आता बाकिचे अवयव (तुमचे तुम्हालाच माहीती , किती आहेत ते..) शिथिल करायला घ्या .. पुन्हा सांगतो .. हे अगदी हल्लू ह्ल्लू करायचे , क्रमाक्रमाने करायचे… आंगठा, बोटे , पाऊल, टाच, नडगी, पोटरी, गुढगे, मांडी …
” बस्स बस्स इस्टॉप … पुढ्चे आले घ्येन्यात …”
“हुषार आहात ! ”
पण हे करत असताना श्वास अगदी मंद , संथ आणि एका लयीत करायचा.. या टप्प्यावर झोप लागू शकते .. काही जण चक्क घोरायला लागतात…
वोक्के…
एव्हाना पाच – दहा मिनिटे नक्कीच झाली असतील ..तुमचा श्वास किति संथ, नियमीत होतो आणि तुमचे शरीर (म्हणजे बॉडी च ना? ) किती चांगले शिथिल होते यावर ह्या नुस्क्याचे यश अवलंबून असते .
ज्यांना हा नुस्का अजून स्टॉंग करायचा आहे किंबहुना या नुस्क्याचा अधिक प्रभावी परिणाम पाहावयाचा आहे त्यांनी ही ‘शिथिल अवस्थेत जाणे’ ही प्रक्रिया जरा जास्त गांभीर्याने घेतली पाहीजे.
तसे पाहीले तर खर्या अर्थाने शिथील झाल्या शिवाय हा नुस्का (किंवा असले नुस्के, म्हणा हवे तर) कामच करणार नाही, तेव्हा हे शिथीलीकरणाचे तंत्र उत्तम रिता अवगत करुन घेणे अत: लाभदायक ठरणार आहे.
जर वाचकांची इच्छा असेल तर त्यांनी कॉमेंटस मध्ये ती व्यक्त करावी, जर बर्याच जणांना हे तंत्र जाणून घ्यायचे असे दिसले तर मी त्याविषयी एक खास लेख ‘बॉडी करा रे शिथिल’ लिहावयाचे नक्की मनावर घेईन.
आता पुढचा टप्पा !
‘जो जे वांछील ते तो लाहो’ असे संत श्री ज्ञानेश्वरांनी लिहले आहे तेच…
म्हणजे आपली जी काही आशा , आकांक्षा, ईच्छा असेल त्याचे स्मरण करा … म्हणजे कोणाला जे काही हवे असेल ते .. पैसा, गाडी, घर , बायको, संतती, नोकरी ते मनात आणा … कोणाला स्पर्धा परिक्षेत यश मिळवायचे असेल, कोणाला एखादे व्यसन सोडायचे असेल (कैच्या कै राव !) असे जे काही तुम्हाला ‘घडायला ‘ हवे आहे त्याची कल्पना करा…
ही कल्पना ही अशी करायची की जे हवे आहे / जे व्हायला हवे आहे ते आधीच झाले आहे अशा तर्हेने ही कल्पना करायची …
“म्हणजे कसे म्हणतासा बापू साह्येब …”
सोपे आहे … ज्याला ‘घर ‘ हवे असेल त्याने आपल्या कल्पनेतले घर आपल्या मालकीचेच झाले आहे असे चित्र डोळ्या समोर आणायाचे..
ती इमारत,
वॉचमन ,
पार्किंग लॉट मध्ये स्वत:चे नाव असलेली लेटर बॉक्स ,
इमारतीत राहणार्या लोकांची मोठी यादी आहे त्यात स्वत:चे नाव दिसतेय..
किंवा सब रजिस्ट्रार च्या ऑफिस मध्ये आहात , समोर तुम्हाला हव्या असलेल्या घराच्या सेल डीड चे कागदपत्रे आहेत , तुम्ही सही करताय …
बिल्डर तुम्हाला घराची चावी देतोय…
किंवा एका इमारतीच्या समोर उभे राहून तुम्ही तुमच्या बायकोला / आई वडीलांना सांगताय “तो दुसर्या मजल्या वरचा कॉर्नर चा फ्लॅट दिसतो ना , तो आपला बरे का , ”
तुमच्या सामानाचा ट्रक त्या इमारती समोर येऊन थांबलाय, तुम्ही हमालांना सांगताय … दुसरा माळा, डाव्या हाताचा फ्लॅट… “जपून न्या रे , तोड मोड नको पायजे..”
कोणीतरी विचारतेय …
“नविन रहायला येता आहात का? ”
तुम्ही अभिमानाने सांगताय –
“हो गेल्याच आठवड्यात पझेशन मिळाले ”
विविध प्रकारे हे असे प्रसंग़ तयार करुन डोळ्या समोर आणता येतील. वाटल्यास नुस्का चालू करण्या पूर्वी पेपर मध्ये आलेल्या बिल्डींगच्या जाहीराती डोळ्यात ठेवा …
ज्यांना धनलाभाची अपेक्षा असेल त्यांनी “पैसे मोजतोय ‘, ‘ब्यॅकेत चेक भरतोय “. असे चित्तर मनासमोर आणा … नव्या नोटांचा वास … नोटा मोजतानचा आवाज .. कोर्या करकरीत नोटांचा ऊबदार स्पर्श अनुभवा … त्यासाठी नुस्का चालू करण्या पूर्वी खरेच एक नोटाचे बंडल हातात घेऊन ते सगळे अनुभवा (स्पर्श, वास, आवाज ) …
तुमच्या कडे चेकबुक असेल तर एक चेक भल्या मोठ्या रकमेचा स्वत:लाच नावे .. लिहा आणि बराच काळ निरखून पाहून मनात , स्मृतीत पक्का साठवून ठेवा… नुस्का चालू असताना ह्या चेक ची प्रतिमा डोळ्यासमोर आली पाहीजे..
ज्यांना एखादे व्यसन सोडायचे त्यांनी ते व्यसन सुटले आहे अशी कल्पना करा.. सगळ्या चैतन्य पेयाच्या बाटल्या खळ्ळ्कन फुटल्या आहेत अशी कल्पना करा .. वाट्ल्यास एखादी चैतन्य पेयाची (रिकामी!) बाटली फोडून तो आवाज कसा काय असतो ते मनात रेकॉर्ड करा … व्यसन सुटल्याने लोक तुमचे अभिनंदन करत आहेत , समाजात तुमची इज्जत वाढते आहे… व्यसन मुक्ती केंद्रात तुम्हाला तुमचे अनुभव सांगायला बोलावणे आले आहे अशी कल्पना करा…
अर्थात जे काही मागायचे ते तुमच्या आवाक्यातले मागा … जे शक्य होऊ शकेल असेच मागा. उगाच अंबानी ची बरोबरी किंवा बॉलीवुड मधल्या एखादीची हाव धरु नका ( अबे , ते ‘सनी’ चे नाव कोण घेऊन रायलेय रे बाप्पा तिकडे ?)
आता पुढचा टपा …
आता पर्यंत तुमच्या समोर तुम्हाला जे हवे आहे / जे व्हायला हवे आहे त्याचे छान पैकी चित्र तुमच्या डोळ्या समोर उभे असेल.आता कल्पना करायची की कोठून तरी , अवकाशातून एक भला मोठा गुलाबी बुडबुडा (फुगा म्हणा वाटल्यास) तुमच्या समोर येत आहे … नाजूक … चमकदार असा बुडबुडा …
आता तुमच्या समोरची वस्तू / चित्र (नोटांचे बंडल !) तुम्ही त्या बुडबूड्यात टाकायचे … वस्तू – चित्र मोठे किंवा अॅबस्टॅक्ट असेल (घर , व्यसन मुक्ती ) तर कल्पना करायची की हा बुडबूडा हळू हलू मोठा होतोय आणि वस्तू / चित्र यांना लपेटून घेतोय … वस्तू त्या बुडबूडयात गेलीय …
बुडबूड्याची भिंत नाजूक , पारदर्शी असल्याने तुम्हाला त्या वस्तू अजुनही दिसत आहेत …
त्या तुमच्याच आहेत … त्या तुम्हालाच मिळणार आहेत…
आता पुढचा टप्पा..
तुमच्या समोर तो गुलाबी बुडबूडा आहे , त्यात तुमच्या वस्तू / ईच्छा – आकांक्षा आहेत … आता कल्पना करा की … तुम्ही तो बुडबुडा हळूच ढकलून त्याला हवेत मुक्त करताय … एखाद्या खेळाच्या स्पर्धेच्या उदघाटनाच्या वेळी कबुतरे सोडतात ना तशी कृती करा… कबुतरा ऐवजी बुडबुडा ,,
बुडबूडा आता हवेत तरंगतोय,
बुडबूडा आता आकाशात उंच उंच जातो आहे…
तुमच्या वस्तू त्यात आहेत …
त्या तुम्हाला अजुनही स्पष्ट दिसत आहेत…
या वस्तू तुमच्याच आहेत …
त्या तुम्हालाच मिळणार आहेत…
बुडबूडा आता खूपच उंच गेला आहे एखाद्या ठिपक्या सारखा दिसतोय…
बस्स, आता शेवटचा टप्पा.
बुडबूडा गेला केव्हाच पण तुम्ही तसेच शांत पडून / बसुन रहा… बुडबूड्याचा विषय डोक्यातून काढून टाका … मी मागणी केली आहे … आणि ती मागणी तो बुडबूडा पूर्ण करणारच अशी आश्वासक भावना मनात आणा …
दोन – चार मिनिटे जाऊ द्या…
आता हळू हळू डोळे उघडा.. पण लगेच उठून हालचाली करु नका.. अजुन काही काळ , पाच मिनिटे डोळे उघड्लेल्या अवस्थेत बसून / झोपून रहा..आता उठा .. बुडबुड्याला विसरुन जा ,… तुम्ही तुमचे काम केलेत ना … आता बुडबूडा त्याचे काम करेल… विश्वास ठेवा..
नुस्का पूर्ण !
हे असे किती वेळ करायचे मास्तर ?
त्याला काही लिमिट नाही… कंटाळा येई पर्यंत करा ना राव , तुम्हाला कोण अडवलेय ! रोज करा , एक दिवसा आड करा पण करा .
आणि हो…
एखादीच ईच्छा मनात ठेवा … बुडबूडा म्हणजे शॉपिंग मॉल नाही हे लक्षात ठेवा..
तसेच एक ईच्छा जी मनात धरली असेल तीच रोज असूद्या .. रोज कोणती तरी नवी ईच्छा ठेऊन प्रयत्न करु नका………………………………. बुडबूडा वैतागेल.
आणखी एक, आधी सांगीतले तसे आपल्या आवाक्यातल्या ईच्छा धरा .. उगाच पाली हिल वरच्या बंगल्याची स्वप्ने बाळगू नका.. २ BHK त असाल तर रो-हाऊस ची ईच्छा असू दे. कळले..
त्या बूडबूड्या कडे पण बघा जरा … ‘क्या बच्चे की जान ले रहे हो क्या?”
मी तर सुचवेन अगदी लहान ईच्छा घेऊन सुरवात करा … एकदा का हे तंत्र अवगत झाले आणि त्याचे रिझल्ट मिळायला लागले की मग जरा बड्या इच्छा धरायला हरकत नाही.
लगेच रिझल्ट मिळणार नाहीत . काही गोष्टींना वेळ लागतो… सरकारी काम आणि सहा महिने थांब म्हणतात ना तसलाच प्रकार आहे हा … आणि त्या बुडबूड्याल्या काय तुमचे एकच काम आहे काय?
तेव्हा थंड घ्या.. प्रयत्न चालू ठेवा .. अगदी आश्चर्य कारक पद्धतिने ईच्छा पूर्ण झाल्या आहेत असा माझा आणि बर्याच लोकांचा अणूभव आहे.
हा नुस्का यशस्वी होण्यासाठी खाली लिहलेला बाबींची पूर्तता होणे अत्यंत जरुरीचे आहे, किंबहुना या बाबी तुम्हाला जितक्या चांगल्या जमतील तितके यश लौकर आणि परिपूर्ण असेल.
- तुमचे शरीर पुर्णपणे शिथिल होणे… काहीशी ग्लानी – गुंगीची अवस्था प्रापत होणे.
- आपल्या आशा -आकांक्षांचे उत्तम , रंगीबेरंगी, जिवंत, रसरशीत चित्र उभे करता येणे ज्यात रंग, वास, आवाज , हालचाल युक्त प्रतिमा असे असावे , हे अत्यंत समरसतेने करता येणे.
- बुड्बुड्याला आपल्या आवाक्यातल्या गोष्टी सांगणे .. अशा बाबीं की ज्या तुम्हाला आज अत्यंत अवघड वाटतात पण जरा जास्त परिश्रम करुन का होईना प्राप्त होऊ शकतील अशा .. (मागणी करतानाच जर तुमच्याच मानत शंका कुशंका असतील.. हॅट हे कसले होतेय, हे कसले जमायचे … खिशात पाच फुटी कवडी पण नाही आणि 3 BHK टेरेस फ्लॅट ? कसे शक्य आहे हे ..” असले विचार असेल तर बुडबूडा काही करु शकणार नाही… तुमचा स्वत:चा अढळ विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे.
तुमच्या ईच्छा आकांक्षा या अशाच असल्या पाहीजेत:
- वैयक्तीक (स्वत: साठी मागा , दुसर्या साठी नको)
- सकारात्मक ( पोझीटीव्ह … ऑफिस मधला बॉस गचकावा वा त्याच्या जागी मला प्रमोशन मिळावे किंवा पराया धन , परायी नार असले काही नको..)
- मेझरेबल ( ज्या वस्तू मोजता येतात किंवा मापता येतात त्या मागा .. पैसा, घर , गाडी, बायडी इ.
- नुस्ते ‘मला सुखी-समाधानी कर , आनंदी कर’ असे नको…
तर मंडळी , करुन पहा हा नुस्का ..आणि आपले अनुभव कळवा..
आमचा पत्ता लिहून घ्या … कश्शाला .. तुम्हाला माहीतीच आहे की राव !
शुभं भवतु
- गो फर्स्ट क्लास (Go First Class) ! - August 8, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ४ - July 2, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ३ - July 1, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – २ - June 30, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – १ - June 22, 2019
- ‘मान्सून धमाका’ सेल - June 10, 2019
- केस स्ट्डी: लाईट कधी येणार ? - June 9, 2019
- असे जातक येती – १३ - May 29, 2019
- माझे ध्यानाचे अनुभव – २ - April 29, 2019
- ज्योतिष शिकायचेय ? - April 26, 2019
श्री. सुहासजी,
नुस्का एकदम मस्त !!
आजच वापरून बघतो.
एक खास लेख ‘बॉडी करा रे शिथिल’ – लवकर येऊ द्या
धन्यवाद,
अनंत
श्री. अनंतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद, तो ‘बॉडी करा रे शिथिल ‘ लेख येतोय ,
सुहास गोखले
Kakanchi gadi Susan weganey nighali na bho
….
Jamtai jamtai…
Yeu dya Ase ajun nuskey:)
श्री. मंदारजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले
Thanks for sharing.
श्री. हिमांशुजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
सुहास गोखले
सर , खूपच छान, मी पण हा गुलाबी बुडबुडा वापरून पाहीन म्हणते. धन्यवाद हं ! पुढच्या लेखाची आतुरतेने वाट पाहत आहे.
सईजी,
धन्यवाद, जरुर प्रयत्न करा … लगेच इंस्टंट यश मिळेल अशी अपेक्षा धरु नका , लहान सहान गोष्टीं पासून सुरवात करा.. पण सगळ्यात म्हणजे ‘रिलॅक्स’ व्हायला जमले पाहीजे… हीच तर त्यायली मेख आहे… या बद्दल मी आणखी एक लेखा लिहत आहेच …
सुहास गोखले
मस्त सुहास जी .छान विनोदी शैलीत लेखन केले आहे . हसलो खूप ! मी अशा विषयावर खूप पुस्तके वाचली आहेत .म्हणजे वगैरे वगैरे . एक शंका विचारतो समजा जोतिष शास्त्र प्रमाणे जर आपल्या आयुष्यात जर स्वतः च्या घराचे योग नसतील आणि जर आपण या पद्धतीचा चांगला सराव करून जर ती इच्छा संकल्प सोडला तर काय होईल ? ती पूर्ण होईल का कसे ? (घर वगरे उदाहरण दाखल घेतलेय.) मला खूप दिवसापासून हि शंका आहे . पण समाधान कारक उत्तर मिळालेले नाही . काही मार्गदर्शन कराल काय ?
स्वप्नील जी,
का नाही होणार ? जरुर होईल
सुहास गोखले
…… आणि हो सुहास जी गुढ , गंभीर , अमानवी , तांत्रीक वाले नुस्के मी इतरत्र वाचले व चक्क करुन पाहीले आहेत … विस्मयकारक , चित्तथरारक अनुभव पण घेतले आहेत —–हे पण वाचण्यास उत्सुक आणि एखादा तांत्रिक प्रयोग जो सांगण्यासारखा असेल तो पण Share करा वर लिहिलेल्या प्रयोगासारखा ….
स्वप्नील भाऊ ,
ते नुस्के डेंजर आहेत . असे ओपण मध्ये शेअर करणे धोक्याचे आहे. तरी पण एक किस्सा जरुर सांगेन … साहीत्य आणि कृती सकट … असाच केव्हातरी … (तुम्ही मला फारच कामाला लावता बुवा !)
सुहास गोखले
(तुम्ही मला फारच कामाला लावता बुवा !) …. हा…..हा……हा…..Like…!!
हे पुस्तक संग्रही पडून आहे काही वर्षे. आपला हा लेख वाचुन जसे काही त्याचे core concept समजले (केवळ समजले ….. अनुभवावे लागेल 🙂 ) असे वाटतेय
श्री.अमितजी
अभिप्राया बद्दल धन्यवाद
धन्यवाद
सुहास गोखले