तुम्ही म्हणाल समोर पत्रिका नसताना आणि पंचांग किंवा तत्सम साधने हाताशी नसताना हे असे बरोबर, अचूक कसे सांगता आले?

नाही, नाही, हे कर्ण पिशाच्च वगैर नाही की कोणती गुप्त साधना नाही की अघोरी विद्या नाही. असे सांगणे अवघड असले तरी अशक्य नाही. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाची भक्कम बैठक आणि नाडी ज्योतिषातली काही मुलभूत तत्वे चांगली आत्मसात केली असतील तर हे असे सांगणे जमू शकेल.

मात्र या अभ्यासा बरोबरच पाहीजे चांगली स्मरणशक्ती, तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता आणि थोडी शोधक नजर!

आता ‘हे कसे?” याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल ना?

 

या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा    काप्पे अ‍ॅस्ट्रॉलॉजी भाग – १

 

रंगिनी बेन फोन वर बिझी होत्या, समोर रमणीकलाल पेपर मध्ये तोंड खुपसुन बसला होता,  माझ्या मनात एक कल्पना आली, या ‘तरंगिनी बेन’ ना जरा ज्योतिषशास्त्राची काही कमाल दाखवता येईल का?

आता अशी कमाल दाखवायची असेल तर इतर अनेक ज्योतिषी करतात तशी  ‘माझे हे भाकीत बरोबर आले, मी हे अमुक तमुक घडणार असे सहा महीने आधीच सांगीतले होते, माझा या मासिकात लेख छापुन आलाय, मी ज्योतिष शास्त्री / ज्योतिष शिरोमणी आहे’ या थाटाची विधाने करुन काही उपयोग होणार नाही. त्या पेक्षा जातकाला त्याच्या बाबतीतच काहीतरी ठोस (कनव्हीनसिंग ) असे (भविष्य) काही सांगीतले तर त्याचा माझ्यावर विश्वास बसेल. कल्पना चांगली असली तरी असे करणे म्हणजे जातकाला फुकट भविष्य सांगणे होईल आणि ते माझ्या तत्वात बसणार नाही आणि दुसरे त्या पेक्षा महत्वाचे असे की मी आज सांगीतलेले भविष्य जो पर्यंत खरे ठरत नाही तो पर्यंत तरंगिनी बेन माझ्या वर कसा काय विश्वास ठेवतील ? आज काहीतरी सांगायचे त्याचा पडताळा यायला काही महिने / वर्ष लागणार, तो पर्यंत कोण थांबणार? त्या पेक्षा तरंगिनी बेन च्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना जर बरोबर सांगीतल्या तर तरंगिनी बेन चा विश्वास बसेल. (आणि मोफत भविष्य सांगीतले असेही होणार नाही, साप भी मरें और लाठी भी ना टुटे!).

तेव्हा तरंगिनी बेन ला ‘हा सुर्य हा जयद्रथ’ असे काहीतरी सांगायला हवे … पण हे कसे?

भविष्य काळातील घटना असो वा भुत काळात घडलेले काही प्रसंग, असे काही सांगायचे म्हणले तर जातकाची जन्मपत्रिका मग ती ठोकळा का होईना समोर असायला पाहीजे ना? या तरंगिनी बेन ची जन्मपत्रिका कशी असेल? माझ्या डोक्यात विचार चक्रे सुरु झाली…………

आता पहा , त्यावेळी माझ्या कडे ना कागद ना पेन, ना पंचांग , ना नोटस , ना संदर्भ ग्रंथ , फोन मध्ये डेटा प्यॅक नसल्याने ऑन लाईन पत्रिका बनवता येणार नव्हती की कोणता इंटरनेट सर्च करता येणार नव्हता, थोडक्यात त्या क्षणी बाहेरची कोणतीही मदत मला मिळणार नव्हती. त्या मुळे जातका बद्दल जी काही माहीती उपलब्ध आहे ती वापरुनच मला काय करता येईल? हे एक मोठे आव्हानच  होते, पण मला जात्याच कुट प्रश्न / शब्द कोडी , रहस्य कथा / जासूसी कथा असे मेंदु ला खुराक देणारे काम फार आवडते त्यामुळे  , हे एक आव्हान आहे असे मानून एक प्रयत्न करायचे ठरवले!

तरंगिनी बेन च्या बोलण्यातून मला तीन गोष्टीं कळल्या होत्या:

 1. जन्म २० जुन १९७५.
 2. जन्म वेळ सुर्योदयाची.
 3. ‘तरंगिनी’ हे नाव जन्मनक्षत्रा वरुन ठेवले.

(जन्मगाव अहमदाबाद, पण या माहीतीचा सध्याच्या परिस्थितीत उपयोग करुन घेता येणार नव्हता)

या इतक्या अपुर्‍या माहीती वरुन काही अंदाज व्यक्त करायचा म्हणजे ‘सुता’ वरुन स्वर्ग गाठण्या सारखेच आहे! पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? उत्तर चुकले तर चुकले त्यात काय !

मी सुरवात केली ….

सगळ्यात पहीले काम म्हणजे जातकाचे जन्मलग्न ठरवणे !

हे काम तसे सोपे होते. सगळ्या ग्रहतार्‍यांत सुर्य हा एकटा प्राणी कमालीचा नियमीत आहे, त्यामुळे कोणत्याही दिवशी सुर्य कोणत्या राशीत कोणत्या अंशावर असेल हे कोणत्याही पंचांग / अ‍ॅप / सॉफ्टवेअर यांच्या आधारा शिवाय तोंडी अगदी बरोबर सांगता येते. सुर्य दर वर्षी १५ जुन ला मिथुन राशीत प्रवेश करतो आणि सुर्याची सरासरी गती दिवसाला १ अंश असते. ह्या हिशेबाने २० जूनला , तरंगिनी बेन च्या जन्मदिनी रवी मिथुन राशीत ४-५ अंशावर असला पाहीजे.

कोणत्याही दिवशी सुर्योदयाच्या वेळी, सुर्य त्या दिवशी ज्या राशीत असतो तीच रास पूर्व क्षितिजाला उदीत असते आणि अगदी बरोबर सुर्योदयाच्या ठोक्याला पुर्व क्षितीजा वर उगवणार्‍या राशीचे अंश आणि त्या दिवशीचे सुर्याचे अंश एकच असतात. तरंगिनी बेन च्या म्हणण्या नुसार त्यांचा जन्म सुर्योदयाला झाला आहे, त्या दिवशी रवी मिथुन राशीत होता हे आपण पाहीलेच आहे त्यामुळे २० जूनला अगदी उजाडतीला पुर्व क्षितीजावर मिथुन रास उदीत असणार. म्हणजेच सुर्योदयाला मिथुन लग्न चालू असेल. अगदी सुर्योदयाच्या ठोक्याला रवी च्या अंशा इतकेच मिथुन लग्नाचे अंश असणार , सुर्योदया नंतर जन्मलग्न दर चार मिनिटांना १ अंश या गतीने मिथुनेतच पुढे सरकत राहील , जातकाने जन्म सुर्योदयाला असे सांगीतले असले तरी तो अगदी नेमका सुर्योदयालाच झाला असेलच असे नाही , सुर्योदया नंतर साधारण अर्धा एक तासाने जन्म झाला असेल असे गृहीत धरल्यास जन्मलग्न मिथुन साधारण ११ अंशावर असेल आणि रवी मिथुनेत ४-५ अंशात असल्याने तोही क्षेत्र कुंडलीत लग्नातच असणार.

या टप्प्यावर जन्मलग्न आणि रवी ची स्थिती नक्की झाली.

जातकाचे नाव ‘तरंगिनी’ हे जन्म नक्षत्रावरुन ठेवले आहे, आता हे जन्मनक्षत्र म्हणजे जन्माच्या वेळेला चंद्र ज्या नक्षत्रात होता ते नक्षत्र. ‘तरंगिनी’ म्हणजे ‘त’ हे अक्षर, म्हणजे ‘स्वाती’ नक्षत्र चतुर्थ चरण, स्वाती नक्षत्र तुळ राशीत येते. स्वाती नक्षत्राचा चतुर्थ चरण म्हणजे तुळ रास १६ ते २० अंश. म्हणजे तरंगिनी बेनचा चंद्र तुळ राशीत १६ ते २० अंशावर असणार. मिथुन लग्नाला तुळ रास पंचम भावा वर येते म्हणजे चंद्र पंचम स्थानात आहे.  

पहा पत्रिका आता अधिक स्पष्ट झाली:

मिथुन लग्न साधारण ११ अंश, रवी मिथुनेत ५ अंशावर लग्नात , चंद्र तुळेत १६ ते २० अंशावर पंचम स्थानात! (आपण १६ – २० चा मध्य १८ अंश मानू) 

जन्मलग्न, रवी आणि चंद्र निश्चीत झाले तरी अजून बाकीच्या ग्रहांचा पत्ता काय?

ज्योतिष हा माझा व्यवसाय असल्याने १९०० ते आजच्या तारखे पर्यंतच्या गुरु – शनी- युरेनस- नेपच्युन – प्लुटो यांची प्रत्येक वर्षाची राशीगत स्थिती मला जबानी याद आहे!

यात अवघड / चमत्कार असे काहीही नाही, या सर्व ग्रहांची गती मंद असल्याने ग्रहांच्या स्थितीमध्ये रोजच्या रोज बदल होत नाहीत. गुरु वर्षातून एकदा रास बदलतो, शनीला रास बदलायला अडीच वर्षे, युरेनस ला सात वर्षे, नेपच्युन, प्लुटो यांना तेरा-चौदा वर्षे असा संथ मामला असतो. या ग्रहांच्या राशी बदलाचे तक्ते तयार केले आणि रोज सकाळी काम सुरु करताना  हे पाच तक्ते एकदा डोळ्याखालुन घातले की झाले, चार – पाच महीन्यात हे सगळे तोंड पाठ होऊन जाते. (प्रयत्न करुन पाहा, तुम्हालाही जमेल ते!)

मी माझ्या स्मरणशक्तीला ताण दिला आणि १९७५ मध्ये हे ग्रह कोठे होते ते आठवले.

१९७५ मध्ये:

 1. गुरु मीनेत
 2. शनी मिथुनेत
 3. युरेनस तुळेत
 4. नेपच्युन वृश्चीकेत
 5. प्लुटो कन्येत

असे ग्रहमान होते, अर्थात मी फक्त या ग्रहांच्या राशी लक्षात ठेऊ शकतो , प्रत्येक दिवशीची अंशात्मक स्थिती लक्षात ठेवणे मानवी मेंदुच्या कुवती पलीकडचे आहे. त्या साठी आपल्याला त्या त्या वर्षाच्या एफेमेरीज (पंचांग) हाताशी पाहीजेत.

असे जरी असले तरी या आऊटर प्लॅनेट्सची अंदाजे का होईना अंशात्मक स्थिती आपल्याला ठरवता येईल का? येईल , या ग्रहांच्या राशी बदलांचे तक्ते (टेबल्स) पाठ केले असतील तर फार अवघड नाही!

गुरु च्या राशी बदलाचा तक्ता (टेबल) पाठ केला आहे त्यानुसार जातकाच्या जन्माच्या वेळी गुरु मीनेत होता. याच तक्त्यावरुन लक्षात येते की गुरु फेब्रुवारी १९७५ मध्ये मीनेत आला आणि फेब्रुवारी १९७६ मध्ये तो मीनेतुन मेषेत गेला. मीन रास ओलांडायला त्याला १२ महीने लागले म्हणजे मीने चे २.५ अंश ओलांडायला गुरु ला सरासरी १ महीना लागला, त्या हिशेबाने जातकाच्या जन्मदिनी म्हणजे २० जुन १९७५ रोजी गुरु मीनेत १२ अंशावर असेल. .

(हा अंदाज चुकला ! कारण नेमकी १९७५ मध्ये गुरु ची गती कमालीची वाढली  त्याने जुलै मध्येच मीन रास ओलांडली पण नंतर मेषेत जाऊन तो वक्री झाला आणि परत मीनेत आला आणि बराच काल मीनेत राहून तो १९७६ मध्ये पुन्हा मेषेत गेला! तरंगिनी  बेन च्या जन्म दिवशी गुरु मीनेतच पण २६ अंशावर होता !  )

शनी जुन १९७३ मध्ये मिथुनेत आला आणि  जुलै १९७५ मध्ये तो मिथुनेतुन कर्केत गेला. मिथुन रास ओलांडायला शनीला  २५ महीने लागले आहे म्हणजे शनी एका महीन्यात मिथुनेचा १ अंश ओलांडायला शनी ला सरासरी  १ महीना ६ दिवस लागले. त्या हिशेबाने  जातकाच्या जन्मदिनी म्हणजे २० जुन १९७५ रोजी शनी मिथुनेत  २९ अंशावर असेल.

(हा अंदाज थोडासा चुकला, तरंगिनी  बेन च्या जन्म दिवशी शनी मिथुनेत २५अंशावर होता)

युरेनस नोव्हेंबर १९७३ मध्ये तुळेत आला आणि  ऑक्टोबर १९८० मध्ये तो तुळे तुन वृश्चीकेत गेला. तुळ रास ओलांडायला युरेनस ला  ७ वर्षे लागली म्हणजे युरेनसने एका वर्षात तुळेचे  ४.२५ अंश ओलांडले. त्या हिशेबाने जातकाच्या जन्मदिनी म्हणजे २० जुन १९७५ रोजी युरेनस तुळेत ४ – ५ अंशावर असेल.

(हा अंदाज तसा बरोबर आला , तरंगिनी  बेन च्या जन्म दिवशी युरेनस तुळेत ५अंशावर होता, पण त्या दिवशी तो वक्री होता! )

नेपच्युन १९६७ च्या अखेरीस वृश्चिकेत दाखल झाला आणि तो १९८१ च्या अखेरीस तो वृश्चीकेतून धनेत गेला. वृश्चिक रास ओलांडायला नेपच्युन ला १४ वर्षे लागली म्हणजे नेपच्युनने एका वर्षात वृश्चिकेचे  २.१२५ अंश ओलांडले. त्या हिशेबाने जातकाच्या जन्मदिनी म्हणजे २० जुन १९७५ रोजी नेपच्युन वृश्चिकेत १५ अंशावर असेल.

(हा अंदाज तसा बरोबर आला , तरंगिनी  बेन च्या जन्म दिवशी नेपच्युन वृश्चिकेत १६ अंशावर होता, पण त्या दिवशी तो वक्री होता! )

प्लुटो १९६९ च्या मध्यावर कन्येत दाखल झाला आणि तो १९८१ च्या अखेरीस तो कन्येतून तुळेत गेला. कन्या रास ओलांडायला प्लुटोला १२ वर्षे लागली म्हणजे प्लुटोने एका वर्षात कन्येचे  २.५ अंश ओलांडले. त्या हिशेबाने जातकाच्या जन्मदिनी म्हणजे २० जुन १९७५ रोजी प्लुटो कन्येत ११-१२ अंशावर असेल.

(हा अंदाज बरोबर आला, तरंगिनी  बेन च्या जन्म दिवशी प्लुटो कन्येत १३ अंशावर होता)

आपल्याला कळलेली ही ग्रहस्थिती फक्त गुरु, शनी आदी मोठे ग्रह आणि रवी- चंद्र इतकीच आहे, यात शुक्र , बुध , मंगळ, राहु आणि केतु नाहीत.

शुक्र आणि बुध यांच्या स्थितीचा अंदाज रवीच्या स्थिती वरुन करणे फारसे अवघड नाही. शुक्र आणि बुध हे दोघेही ग्रह रवी पासुन फार लांब नसतात एक – दोन रास अलिकडे पलीकडे इतकेच. त्यातला बुध सहसा रवी ज्या राशीत असतो त्याच राशीत असतो. मात्र मंगळाचा अंदाज पंचांग (एफेमेरीज)  शिवाय बांधता येणे अशक्यच आहे. राहु (केतु) चा राशी बदलाचा तक्ता पाठ करणे अवघड नाही पण मी ते केले नव्हते. (काय काय म्हणून पाठ करायचे ? क्या बच्चे की जान लोगे क्या? )

या पत्रिकेत बुध कोठे असेल?

बुध हा सुर्या पासुन जास्तीत जास्त २८ अंश अलिकडे पलिकडे जाऊ शकतो.

सुर्य मिथुनेत ५ अंशावर आहे. त्यामुळे बुध हा एकतर मिथुनेत  – लग्नात , कर्केत – धनस्थानात  किंवा वृषभेत व्यय स्थानात असणार. पण नक्की कोठे ? उपलब्ध माहीती वरुन याचा अंदाज बांधणे शक्य नाही.

(प्रत्यक्षात तरंगिनी बेन चा बुध वृषभेत म्हणजे व्यय स्थानात होता)

या पत्रिकेत शुक्र  कोठे असेल?

शुक्र सुर्या पासुन जास्तीत जास्त ४८ अंश अलिकडे पलिकडे जाऊ शकतो.

सुर्य मिथुनेत ५ अंशावर आहे त्यामुळे शुक्र मिथुनेत  – लग्नातच , कर्केत धनस्थानात,  व्ययस्थानात  वृषभेत किंवा मेषेत लाभस्थानात  असणार.

मी अंदाज केला हा शुक्र धनस्थानात असावा कारण जातकाची सांपत्तीक स्थिती! विकएंड होम ,  हिरे – मोती युक्त दागिने, भारीतली साडी, क्लाव्हा डिझाईनची पर्स,  टॉप मॉडेल आयफोन , अशा अ‍ॅक्सेसरीज बाईंच्या उच्च अभिरुचीची आणि उत्तम सांपत्तीक स्थिती बद्दलची खात्री पटवून देत होत्या, त्याचा विचार करता तसेेच बाईंचा काहीसा कंप पावणारा पण गोड आवाज, डोळे,पाहता त्यांचा शुक्र कर्केत द्वितीय स्थानात असावा हा अंदाज बांधता जास्त बळकट होतो.

अंदाजा प्रमाणे शुक्र जर चंद्राच्या कर्केत असेल तर चंद्र हा शुक्राच्या तुळ राशीत असल्याने हा अन्योन्य योग (म्युच्युअल एक्स्चेँज) होतो, तसेच शुक्र धनस्थानात आल्याने  धनेश (चंद्र ) पंचमात आणि पंचमेश (शुक्र) धनात असा आणखी एक उत्तम अन्योन्य योग पण होतो. याच वेळी दशमातल्या मीनेच्या गुरु शी या शुक्राचा ‘नव-पंचम’ योग पण होईल. असे योग असणे हेच तरंगिनी बेन च्या बाबतीत जास्त समर्पक ठरेल. त्यांच्या संपन्नेतेचे मुळ ह्या योगां मध्येच असावे!

 (शुक्रा बद्दलचा माझा अंदाज नंतर बरोबर ही ठरला!)

 

उपलब्ध माहीती वरुन तयार केलेली तरंगीनी बेन ची पत्रिका साधारण अशी दिसेल:

(ग्रहस्थिती बरोबरच मी अंदाज  केलेले अंश पण दिले आहेत, एक गुरु सोडला बाकी सर्व ग्रहांचे अंश बरोबर ठरले !)

 

 

 

आता पुढे काय?

ते आपण पुढच्या भागात पाहु ….

क्रमश:


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

13 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. प्राणेशजी,

   तसे फार अवघड नाही हे, थोड्या फार प्रयत्नाने कोणालाही जमू शकते. मी इंजिनियरींग चा विद्यार्थी असल्याने अपुर्‍या माहीती वरुन इंटर्पोलेशन तंत्र वापरणे शिकलो आहे त्याचा इथे उपयोग झाला इतकेच. ज्योतिषावरची पुस्तके असोत किंवा क्लास कोणीही अशा पद्धतीने काम करायला शिकवत नाहीत म्हणून एक उदाहरण देऊन ही तंत्रे सांगण्याचा एक लहनसा प्रयत्न केला आहे. आपल्याला तो आवडला हे वाचून समाधान वाटले.

   नाडी ज्योतिष वाले अगदी याच पद्धतीने जातकाची माहिती प्रश्नोत्तरांतून जातकाच्या नकळत काढून घेतात, मग पट्टी हुडकण्याचे नाटक करण्यात वेळ घेतात तेव्हढ्या वेळात ते मी दाखवलेल्या पद्धतीने जातकाची पत्रिका तयार करु शकतात !

   सुहास गोखले

   1+

  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री गोरक्षनाथजी, बर्‍याच दिवसांनंतर आपला अभिप्राय आला , समाधान वाटले

   सुहास गोखले

   0

 1. संतोष

  नमस्कार सुहासजी,

  ह्या वरून जाणवत की बेसिक गोष्टींचा अभ्यास खूप असावा लागतो.
  ग्रहयोगावरून आठवलं, तुमच्या ग्रहयोगावरील पुस्तकाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
  त्या बद्दल काही माहिती ?

  संतोष सुसवीरकर

  0

  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संतोषजी,

   बेसीक्स केव्हाही पक्केच असावे लागतात मग ते ज्योतिषशास्त्र असो की इलेक्ट्रॉनिक्स ! पण सध्या होते काय हे बेसिक्स पक्के करायचा कंटाळा केला जातो, टाळले जाते कारण असे बेसिक्स पक्के करण्यासाठी जी अपार मेहेनत करावी लागते , अंगमोडून काम करावे लागते , वेळ खर्चावा लागतो ते करायची कोणाची तयारी नसते सगळ्यांना 2 मिनिट्स मॅगी सारखे इंन्स्टंट हवे असते ! वरवरचा अभ्यास करुन फक्त पोपटपंची करता येते (ती सुधा चांगली करता येणार नाही) . मुळात आजकाल पत्रिकेचा अभ्यास करुन ज्योतिष सांगणारेच अल्पसंख्याक होत आहेत , उपाय – तोडगे सांगायचेत मग एव्हढा अभ्यास करतो कोण?

   सुहास गोखले

   0

 2. sharyu adkar

  आपली सांगण्याची पद्दत अतिशय छान आहे केवळ र च यावरून ते ग्रह मांडायची रीत वाचून पत्रिका मांडायचे कौशल्य आपणास यावे आणि आपल्यासारखे आमच्या मित्र यादीत असावेत हे आमचे भाग्य

  0

  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री राकेशजी,

   भवीष्य बरोवर येणे न येणे हा भाग बाजूला ठेवला तरी, उपलब्ध माहीती वरुन पत्रिका तयार करता येते हे दाखवायचा माझा प्रयत्न आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.