सो,  मी बाईने प्रश्न विचारला ती वेळ घेऊन एक चार्ट तयार केला …

चार्ट कडे एक नजर टाकताच मी थक्क झालो,  झुडपातून वाघ बाहेर येणार म्हणुन तयारी करावी आणि प्रत्यक्षात एक मरतुकडी शेळी ब्यॅ ss  ब्यॅ करत बाहेर यावी अशातली गत झाली!

म्हणजे रुथ ला माझी परिक्षा घ्यावयाची नव्हतीच तर कारण तसे असते तर इतका सोप्पा गृहपाठ या मास्तरीण बाईंनी मला दिलाच नसता , हे म्हणजे दहावीतल्या विद्यार्थ्याला चौथीचा पेपर सोडवायला दिल्या सारखेच!

आपल्याला काय मस्तच !

 

रुथ साठी बनवलेला होररी चार्ट सोबत दिला आहे:

आज माझ्या आयुष्यात एक घटना घडली आहे ती कोणती?

 

चार्टचा तपशील:

दिनांक: १५ मे २०१७ , वेळ: १७:४०:४३ स्थळ: नाशिक – प्रमोद नगर ऑफ गंगापुर रोड, ट्रॉपीकल (सायन) , प्लॅसीडस , मीन नोडस

 

 

या आधीच्या भागात आपण प्रश्नकुंडली तयार करुन अगदी प्राथमीक स्तरा वरची चाचपणी केली  आता जरा जास्त खोलात जाऊन अभ्यास करु.

 

प्रश्नकर्ती  ‘रुथ पॉवेल‘ :

प्रश्न रुथ ने स्वत: विचारला आहे आणि प्रश्न रुथबद्दलच (रुथ च्या आयुष्यात आज काय घडले?) त्यामुळे म्हणजे लग्न स्थाना (१)  वरुन  रुथ चा विचार करायचा. लग्न ०७ वृश्चिक ०४ वर आहे म्हणजे वृश्चिकेचा स्वामी मंगळ रुथ चे प्रतिनिधित्व करणार, लग्नात एक ही ग्रह नसल्याने मंगळ एकटाच रुथचा प्रतिनिधी होईल, अर्थात चंद्र हा प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असल्याने चंद्र पण विचारत घेणे आवश्यक आहे.

आता या रुथ बाईंच्या आयुष्यात काय घडले असेल ? एक का दोन हजार प्रकारच्या घटनां घडू शकतात एखाद्याच्या आयुष्यात , काय काय म्हणून बघायचे ?

पण असे भांबावून जायचे कारण नाही , सुरवात म्हणून आपण या रुथ बाईंचा प्रतिनिधी मंगळआहे त्याची हालहवाल तपासू , तो कसा आहे , कोठे आहे, कोणाबरोबर योग करत आहे याची खबरबात घेऊ काहीतरी सुगावा लागेलच ना ?

मंगळ १६ मिथुन २८ वर , अष्टमात (८) आहे , मार्गी आहे.  प्रश्नकर्त्याचा प्रतिनिधी अष्टमात  (८) असणे हे कशाचे लक्षण आहे ? अष्टम भाव म्हणजे मृत्यू स्थान तसेच ते मन:स्तापाचे, अडचणीं, मानहानी, नुकसानीचे पण स्थान मानले जाते, म्हणजे रुथबाई अडचणीत आहेत किंवा एखादा अपघात ,नुकसान, आपत्ती असा काही प्रकार असू शकतो.

आता हा मंगळ कसा आहे हे डिग्नीटी / डेबीलीटी टेबल मध्ये पाहू या:

 

 

मंगळ बुधाच्या रुलर शीप मध्ये आहे , बुध अष्टमेश (८) आणि लाभेश (११) आहे , म्हणजे अष्टम स्थान आणि लाभस्थानाचा मेळ घातला तर या ‘अनैतिक (अष्टम स्थान) मार्गाने प्राप्ती (लाभ स्थान)’ असा असू शकतो.

मंगळ गुरु च्या डिट्रीमेंट मध्ये आहे , हा गुरु व्ययात (१२) असून धनेश (२) आणि पंचमेश (५) आहे , म्हणजे गुरु जो रुथ च्या पैशाचा प्रतिनिधी , त्याचा व्यय , पंचम स्थानाचा संबंध म्हणजे म्हणजे ‘जुगारी पद्धतीची / साहसी (पंचम स्थान) गुंतवणूकीतून (धनस्थान) नुकसान *व्ययस्थान) . रुथच्या गुंतवणूकी संदर्भात काही समस्या असू शकतात.

मंगळ शनीच्या ट्रीप्लीसीटी मध्ये , शनी वक्री अवस्थेत धन (२) स्थानात , शनी त्रितियेश (३) आणि चतुर्थेश (४) म्हणजे पुन्हा पैसा (२) , कागपत्रे / करार (३) आणि एखाद्या गोष्टीची अखेर / मालमता (४) असा संबंध येत आहे.

मंगळ शुक्राच्या फेस मध्ये आहे , शुक्र षष्ठात (६) , सप्तमेश (७) आणि व्ययेश (१२) म्हणजे परक्या व्यक्तीशी (७) आणि नुकसान (१२) यांचा संबंध येतो आहे.

अष्टमातल्या या मंगळा शेजारी अष्टमातच ‘फॉरचुना’ (पार्ट ऑफ फॉरच्युन) आहे , फॉरच्युनाचा सरळसरळ संबंध भाग्य , त्यातही आर्थिक बाबींशी आहे, आता मंगळा बरोबर फॉरच्युना ही अष्टमात म्हणजे नक्कीच काहीतरी आर्थिक नुकसानी संदर्भातला हादसा असणार असा प्राथमिक तर्क करता येतो.

गोष्ट आर्थिक बाबीं कडे वळते आहे हे दिसताच आपल्याला रुथ च्या पैशा कडे पाहीले  पाहीजे.  व्यक्तीचा पैसा द्वितीय (२‌) स्थानावरुन पाहतात. या पत्रिकेत द्वितिय स्थान ०६ धनु १८ वर चालू होते, धनेचा स्वामी ‘गुरु’ रुथ च्या पैशाचे प्रतिनिधीत्व करणार. द्वितीय स्थानात शनी आहे म्हणजे गुरु बरोबरच हा शनीही रुथ च्या पैशाचे प्रतिनिधीत्व करणार.

गुरु व्ययात ४ तुळ १८ वर वक्री आहे तर शनी द्वीतीय स्थानात २६ धनु ३६ वर वक्री आहे ! आता काय बोलायचे ? रुथ च्या पैशाचे दोन्ही प्रतिनिधी वक्री आहेत ! धनेश गुरु वयात आहे म्हणजे नक्की रुथ  कोणत्यातरी आर्थिक अडचणीत असणार किंवा एखाद्या व्यवहारात मोठा आर्थिक फटका बसला खाल्ला असणार असे आता जास्त प्रकर्षाने वाटायला लागले आहे.

डिग्नीटी / डेबीलीटी टेबल कडे पाहीले तर लक्षात येते की:

गुरु (रुथ चा पैसा) शुक्राच्या रुलरशीप मध्ये आहे , शुक्र व्ययेश आणि सप्तमेश आहे , म्हणजे रुथ चा पैसा दुसर्‍याच्या ताब्यात (सप्तम) जाणार , खर्च होणार (व्ययस्थान).

आणख़ी एक चित्तथरारक बाब म्हणजे हा गुरु (रुथचा पैसा) , मंगळ (रुथ) च्या डिट्रीमेंट मध्ये आहे म्हणजे पैसा रुथ वर रुसला आहे ! रुथ पासून दूर जात आहे!!!

आता पर्यंत आपल्याला मिळालेल्या धागादोर्‍यां वरुन प्राथमिक कयास असा आहे की ‘आज घडलेली घटना म्हणजे रुथ चे आर्थिक नुकसान’

चला आता आणखी अ‍नॅलायसीस करु….

चंद्र हा प्रश्नकर्त्याच्या नैसर्गिक प्रतिनिधी असतो. तेव्हा या चंद्रा कडे व चंद्राने केलेले ग्रहयोग तपासु कदाचित आणखी काही धागेदोरे मिळतील.

होरारीत चंद्राला फार महत्व आहे, चंद्र हा प्रश्नकर्त्याचा निसर्गदत्त प्रतिनिधी असतो, चंद्र घटना केव्हा घडणार याचा अंदाज देतो, चंद्राच्या स्थिती वरुन जातकाची मन:स्थितीचा काहीसा अंदाज मिळू शकतो. आणि चंद्र ज्या राशीत आहे त्या राशीत तो आल्या पासुन ते चंद्र त्या राशीतून बाहेर पडे पर्यंत त्याने केलेले ग्रह योग आपल्याला जातकाच्या आयुष्यात  , खास करुन प्रश्ना संदर्भातल्या जातकाच्या हालचाली, आजूबाजूची परिस्थिती या बद्दल बर्‍या पैकी अंदाज देतात. चंद्र त्या राशी आल्यापासुन ते चंद्र आत्ता ज्या अंशावर आहे त्या अंशा वर येई पर्यंत चंद्राने केलेले ग्रहयोग आपल्याला प्रश्न विचारायच्या आधीच्या काळात (नजिकच्या) काळात घडलेल्या घटनां बद्दल सांगतात तर चंद्र आत्ता ज्या अंशावर आहे तिथून चंद्र ती रास ओलांडे पर्यंत होणारे सर्व ग्रह योग आपल्याला आगामी काळात (नजिकच्या) घडणार्‍या घटनां बद्दल अंदाज देतात.

या पत्रिकेतला चंद्र १५  मकर ०८ वर  आहे म्हणजे  चंद्र मकरेत आल्या पासुन (०० मकर ००) ते चंद्र त्याच्या सध्याच्या स्थितीत म्हणजे १५ मकर ०८ वर येई पर्यंत झालेले ग्रहयोग घडलेल्या घटना दाखवतील तर चंद्र आत्ता आहे त्या स्थितीतून पुढे जात मकर रास ओलांडे ( २९ मकर ५९) पर्यंत होणारे ग्रह योग आगामी काळात घडणार्‍या घटना दाखवतील.

चंद्र मकरेत आल्या पासुन त्याने केलेले ग्रह योग:

१० मेष ३६ वर असलेल्या शुक्राशी केंद्र योग  (चंद्र : १० मकर ३६)

शुक्र हा या पत्रिकेत व्ययेश (१२) म्हणजे खर्च , कर्ज, गुप्त शत्रु आणि शुक्र सप्तमेश असल्याने तिर्‍हाईत व्यक्ती दाखवतो. म्हणजे नुकताच रुथ चा मोठा खर्च झाला आहे आणि त्याचा एका तिर्‍हाईता(सप्तम स्थान ७) शी संबंध आहे ! केंद्र योग अशुभ असतो हे या मागचे ठळक कारण. (रुथ अविवाहीत आहे हे माहीती असल्याने सप्तम स्थाना वरुन दर्शवल्या जाणार्‍या वैवाहीक जीवन / वैवाहीक जोडीदार या बाबींची शक्यता नव्हती).

१३ मीन ५९ वर असलेल्या नेपच्युनशी लाभयोग  ( चंद्र: १३ मकर ५९)

नेपच्युन ग्रह मानसिक गोंधळ, फसवणूक , भूल थापांचा कारक आहे रुथ चा झालेला वैचारीक गोंधळ झालेला यातुन दिसत आहे , कोणा तिर्‍हाईत व्यक्तीच्या भूलथापांना, मार्केटींग ला फसून आर्थिक वा अन्य प्रकारचे नुकसान झाले असावे.

१४ तुळ ०८ वर असलेल्या गुरु शी केंद्र योग (चंद्र १४ मकर ०८)

गुरु हा रुथ च्या पैशाचा प्रतिनिधी जो व्ययात आहे त्याच्याशी चंद्राचा म्हणजेच रुथ चा केंद्र योग (अशुभ) हेच सांगत आहे की रुथ चे मोठे (गुरु सारखा भव्यतेचा कारक ग्रह असल्याने) आर्थिक नुकसान झाले असावे.

चंद्र सध्याच्या स्थीती पासुन ते मकर रास ओलांडे पर्यंत होणारे ग्रह योग:

१९ मकर १४ वर असलेल्या प्लुटो शी युती ( चंद्र: १९ मकर १४ )

२४ वृषभ ५० वर असलेल्या रवी शी नव-पंचम योग ( चंद्र: २४ मकर ५० )

२६ मेष ११ वर असलेल्या युरेनस बरोबर केंद्र योग ( चंद्र: २६ मकर १९ )

हे तीन ही योग भविष्य काळात होणार्‍या काही घटनां बद्दल सांगू शकतात. अर्थात ह्या आगामी काळातली होऊ शकणार्‍या घटनां असल्याने, ‘आज काय झाले?” या प्रश्नाशी या योगांचा तसा संबंध नाही. या योगांचे परिणाम काय आहेत याचा मला थोडासा अंदाज जरुर आला पण पुरेसा खुलासा होत नाही कदाचित त्या साठी योग्य वेळी दुसरा चार्ट तयार करुन नव्याने अभ्यास करावा लागेल.

ठरल्या प्रमाणे रुथ चा फोन आलाच ! ही बाई अशी पाठ सोडणार का?

“बोल सुहास काही सुगावा लागला”

“हो, तर! तुझा कन्सलटेशन चार्ट सुचवतोय की आज तुला एक बुरी खबर मिळाली असेल”

“१००% बरोबर! पण कसली बुरी खबर, हे सांगता येईल?”

“मला असे वाटते, म्हणजे कन्सलटेशन चार्ट मधल्या ग्रहस्थितीचा विचार करता, ही बुरी खबर एखाद्या आर्थिक व्यवहारा संदर्भात असावी”

“हे पण बरोबर सांगीतलेस! आणखी काही बारकावे सांगता येतील?”

“तु नजिकच्या कालावधीत एखादी ‘जुगारी म्हणजेच स्पेक्युलेटीव्ह’ पद्धतीची गुंतवणूक केली होती ती नुकसानीत गेली असेल”

“हो, अगदी तस्सेच झालेय, दोन महीन्यापर्वी कोणा एकाच्या सांगण्यावरुन मी त्या xxxx xxx कंपनीच्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवले होते तेव्हा वाटले होते शेअरचा भाव वर चढेल कारण त्या सेक्टर मधल्या सर्वच कंपन्यांच्या शेअर्स भाव वाढताहेत, पण नेमक्या ह्याच कंपनीत आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने  हिचे शेअर्स पडले , माझे नुकसान झाले”

“आत्ता नुकसान झाले असे वाटत असेल तुला पण शेअर बाजारात अशी चढ उतार नेहमीच चालू असते तेव्हा आगामी काळात आज पडलेला भाव वरती येऊ शकतो, आणि तुझे नुकसान भरुन निघू शकते”

“हे पण पत्रिकेत दिसत आहे?”

“पत्रिकेतले चंद्राचे आगामी योग काही सुगावा देत आहेत!”

“पण कधी / कसे?”

“माझे आई, सगळे एकाच बैठकीत कसे सांगता येईल. योग्य वेळ आली की नव्याने प्रश्न कुंडली मांडून सांगतो”

“केव्हा?”

“मला वाटते एक – दोन महीने तरी थांबावे लागेल”

“असे टांगून ठेऊन काय मिळते रे तुला?”

“त्यात तर मज्जा असते, रुथ बाई”

“तुला मज्जा वाटते , पण माझे काय ? मी काय करु?”

“काही नाही, फक्त पाच युरोचे छोटेसे पे-पाल पेमेंट करायचे आहे”

“कोणाला?”

“अर्थात मला, सुहास गोखले याला…”

“दुष्ट आहेस..”

 

समाप्त

शुभं भवतु

 

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. अमित

  सुहासजी,

  नेहमीप्रमाणेच हा हि लेख छान झाला आहे. एखादा विषय एकदम सोपा आणी interesting बनवून लिहिण्याची आपली हातोटी एकदम खास आहे, ती उत्तरोत्तर अशीच खास बनत जाओ.

  0

  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री अमितजी

   ज्योतिष विषयावर अशा पद्धतीचे (केस स्ट्डी) फारसे कोणी लिहलेले नाही (निदान माझ्या पाहण्यात तरी नाही) त्यामुळे मी हा एक प्रयत्न केला. ‘एखादा ग्रह अमुक स्थानात म्हणून हे फळ’ किंवा ‘ह्याचा सबलॉर्ड हा म्हणून ते अशा ‘ ‘हा योग आणि तो योग’ अशा थाटाचे बरेच लिहले गेले आहे / लिहले जात आहे पण त्याचा फारसा उपयोग होत नाही ते सगळे नियम पुस्तकातच राहतात आणि प्रत्यक्षात एखादी पत्रिका समोर आली कि गडबडायला होते, तेव्हा मी लिहले आहेत तसे लेख अभ्यासकांना मदत करु शकतील किमान पत्रिका समोर आली की कसा विचार करायचा ह्यासाठी काही तरी एक सुसुत्र कार्यप्रणाली (मेथड / प्रेसीजर) असावी / ठरवावी असे मनापासुन वाटले म्हणून अशी लेखमाला लिहायला घेतली. आपल्याला ही लेखमाला आवडली याचे समाधान आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *