या लेखमालेतला पहीले भाग इथे वाचा…

उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र ! (भाग – १)

उपाय – तोडग्याचे मानसशास्त्र ! (भाग – २)

एक प्रदीर्घ श्वास घेत प्रधान क्षेत्रपाल म्हणाला…

“महाराज , मोठ्या आर्थिक संकटात आहे मी..”

“अरे , तू तर  या दंडकारण्याचा प्रधान क्षेत्रपाल तुला कसली आर्थिक समस्या?”

“महाराज , दिसते तसे नसते.. लोकांना वाटते मला काय कमी आहे पण तसे नाही. कमाई भरपूर असली तरी हा पोकळ डामडौल सांभाळायला खर्च पण तेव्हढाच येतो, गणराज्याच्या  निवडणुकीत पाण्या सारखा पैसा ओतावा लागतो, त्याची भरपाई करे पर्यंत पुढची निवडणूक येते. त्यातच आमच्या चिरंजिवांनी, मेव्हण्यांनी , पुतण्यांनी करुन ठेवलेले उद्योग निस्तरताना तिजोरी रिकामी झाली हो. आणि दुष्काळात तेरावा महीना म्हणतात ना तसे .. मी त्या फिरंग देशात गुपचुप नेऊन ठेवलेली संपत्ती पण उघडकीस आली आहे ,  आता त्या संपत्तीवर सोडायचे.. महाराज काहीही करा या आर्थिक अडचणीं दूर करा..”

“ठीक आहे , बघू  या , काय म्हणताहेत तुझे ग्रह …”

बाबांनी लॅपटॉप उघडला , मघाशी त्या सावकारा साठी केलेली क्षेत्र कुंडली अजुनही स्क्रिन वर होतीच , ती बाबांनी रिफ्रेश केली . अर्थात दोन्ही पत्रिकांच्या वेळांत अवघा २६ मिनिटांचा फरक असल्याने क्षेत्र कुंडलीत कोणताच बदल झाला नव्हता.

त्या प्रश्नकुंडली कडे ओझरती नजर टाकून बाबा म्हणाले..

“काळजीचे काही एक कारण नाही…तुझ्या आर्थिक समस्या नक्की दूर होतील, मी तुला एक तोडगा सुचवतो.. तो न चुकता सव्वा आठ महीने कर .. तुझे प्रश्न सुटले म्हणून समज”

“मी काय करायला हवे आहे महाराज ..”

“सांगतो…तू असे कर कमीतकमी १०० तोळे सोन्याची  एक लक्ष्मी मातेची मुर्ती घडवून घे. त्या मुर्तीची विधीवत स्थापना कर. दर शुक्रवारी त्या मुर्ती समोर एक कुबेर याग कर. माझे काही शिष्य हा योग करुन देतील. ”


“जमेल मला हे ..”

“पुढे ऐक… मी तुला एक कुबेर मंत्र देतो, रोज सकाळी लक्ष्मी मातेची पूजा करुन ह्या कुबेर मंत्राचे १०८ वेळा पठण करायचे ,पठन पूर्ण झाले की ११ ब्राह्मणांना रेशमी वस्त्र , सुगंधी द्रव्यें, ११ सुवर्ण मुद्रा दान द्यायच्या.”

“महाराज, मुर्ती, याग , दान इ. बाबीं सहज जमतील पण वेळे अभावी कुबेर मंत्राचे १०८ वेळा पठण जमेल असे वाटत नाही, त्यात खंड पडेल …”

“वत्सा , तुझी ही अडचण सोडवतो आम्ही.. आमचा एक शिष्य तुझ्या वतीने संकल्प  सोडून या कुबेर मंत्राचे १०८ वेळा पठण करेल, अर्थात त्याची दक्षिणा तुला वेगळी द्यावी लागेल, तु म्हणत असशील तर आत्ताच त्याचे बुकिंग करता येईल..”

“हे काय विचारणे झाले महाराज.. बुकिंग करुन टाका’

बाबांनी आपल्या प्रधान शिष्याला खुण केली.. त्याने लगेच आपल्या लॅपटॉप वर बुकिंग घेतले.

बाबा प्रधान शिष्याला म्हणाले..

“अरे , ह्यांच्या कुबेर यागाचे ही बुकिंग करुन टाक ,  ११ जणांची टीम लागेल”

“बाबा, आपण सांगत होता तेव्हाच यांच्या  कुबेर यागा चे बुकिंग मी करुन टाकले आहे.. ”

“स्मार्ट बॉय… ”

प्रधान क्षेत्रपाल हात जोडत म्हणाला..

“महाराज हे किती दिवस करायचे ?”

“३३  शुक्रवार “

“पण हे केल्याने माझ्या समस्या दूर होतील ?”

“अलबत, कोणतीही शंका घेऊ नकोस , पण हा तोडगा अत्यंत श्रद्धेने करायचा , जा आता ..”

प्रधान क्षेत्रपालाने बाबांच्या पायावर डोके ठेवले आणि तो निघून गेला.

गुरुजींनी लगेच मॅक बुक वर पुढची अपॉईंटमेंट कोणाची आहे हे पहायला सुरवात केली. पण  बाबांना डायरेक्टर बोर्डाच्या मिटींगला जायचे असल्याने आज या  तीनच अपॉईंटमेंट्स होत्या.

बाबांचा अतिथी कक्ष सांभाळणार्‍या शिष्याने सोमरसाचा एक उंच चषक बाबांच्या समोर ठेवला. बाबांनी क्षणभर डोळे मिटले आणि त्या सोमरसाचे घुटके घ्यायला सुरवात केली.

इकडे बाबांचा प्रधान शिष्य अजुनही त्याच्या लॅपटॉप मध्ये डोके खुपसून बसला होता. त्याच्या चेहेर्‍यावरचे  विस्मयाचे भाव बाबांच्या लक्षात आल्या शिवाय राहीले नाही.

“वत्सा.. काही शंका आहेत का ?”

“हो , बाबा..”

“बोल”

“बाबा, आजच्या आपल्या तीनही अपॉईंटमेंट्स दोन तासात संपल्या. पहीला आला होता तो एक गरीब शेतकरी, नंतर तो सावकार आणि शेवटी प्रधान क्षेत्रपाल. या तिघांच्या प्रश्नकुंडल्या एकच आहेत, कारण या काळात पत्रिकेतले ‘लग्न’ बदलले नाही, ग्रहांच्या अंशांत ही काही मोठे बदल झाले नाहीत , जन्मलग्न एकच असल्याने  ग्रहांची स्थाने पण बदलली नाहीत “

“वत्सा … अगदी बरोबर”

“बाबा , या तीनही पत्रिकांत लग्नेश द्वितीय स्थानात म्हणजेच धन स्थानात आहे आणि त्याच्यावर वक्री शनीची दृष्टी आहे. याचा अर्थ मोठ्या आर्थिक समस्या ! आणि त्या प्रमाणे या तीनही जातकांच्या समस्या आर्थिक अडचणीं संदर्भातच होत्या ..”

“वत्सा… अगदी बरोबर ओळखलेस ..तुझा अभ्यास अगदी योग्य दिशेने चाललाय..”

“ही तर आपली कृपा, बाबा.. “

“मग वत्सा , तुझा नेमका गोंधळ  कुठे झाला आहे?”

“बाबा, आजपासून बरोबर ६२  दिवसांनी म्हणजे दोन महीन्यात शनी मार्गी होतोय आणि त्यानंतर २८ दिवसा नंतर  तो राशी पण बदलतोय, म्हणजे शनी मार्गी होताच या जातकांच्या आर्थिक अडचणीं कमी व्हायला सुरवात होतील आणि शनीने राशी बदलल्या नंतर आर्थिक प्रगतीचा वेग  वाढणार आहे ..”

“वत्सा, हे पण अगदी बरोबर ओळखलेस तू ..”

“बाबा,  शनी मार्गी झाल्यानंतर आणि पुढे जाऊन शनी चा राशी बदल झाल्यानंतर या तीनही  जातकांच्या आर्थिक समस्या खात्रीने सुटणार आहेत ..ग्रहमानच तसे आहे.. असे असताना सुद्धा या तिघांनाही तुम्ही उपाय – तोडगे का सुचवले , कारण हे उपाय – तोडगे केले काय किंवा नाही केले काय त्यांच्या आर्थिक समस्या सुटणारच आहेत. ..”

बाबांना शिष्याच्या चौकसपणाचे मोठे कौतुक वाटले. एव्हाना त्यांचा सोमरस संपला होता.. आपल्या रेशमी उपरण्याने ने तोंड आणि दाढी पुसत बाबा म्हणाले…

“वत्सा…त्याचे असे आहे…”

क्रमश: (बहुदा पुढच्या भागात संपूर्ण)

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. स्वप्नील

  चांगलीच idea आहे कि यांची . असो पण सुहास जी एक शंका होती पूर्वीच्या विद्वान ऋषीमुनींनी उदा .व्यास वगैरे नवग्रह स्तोत्र वगरे रचले त्यामागचा हेतू हा मनाला उभारी देणे किवा तत्सम प्रकारचाच असेल ना ? काही जणांच्या मते ग्रह जरी दगड मातीचे असले तरी तो स्थूल भाग झाला त्यांचे अधिपती सूक्ष्म देहाने अस्तित्वात असतात . असो पण ते मनुष्याच्या कार्मिक प्रणाली मध्ये ढवळाढवळ करत नाहीत . या मंत्रांनी त्यांचीशी संपर्क प्रस्थापित होऊन कदाचित भोग पुढे मागे होत असावेत अशी काहींची मते आहेत .असो . पण छान माहिती मिळतीये या कथेतून आणि ती सांगताना जोतीषाचे ज्ञान हि .

  0

  1. सुहास गोखले

   श्री. स्वप्नीलजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद,

   ग्रह घटना घडवून आणत नाहीत त्यामुळे त्यांची किंवा त्यांच्या अधिपतींची (असल्यसा !) पुजा करुन काहीच उपयोग नाही. चांगली कर्मे हाच तुमचा बेस्ट डिफेंस आहे.

   सुहास गोखले

   0

 2. Anant

  श्री. सुहासजी ,

  छान माहिती मिळाली. एकच प्रश्न – तोडगे तीन, प्रत्येकाच्या net worth प्रमाणात.
  बाबांचे या तिन्ही तोडग्यामागील मानसशास्त्र वाचायला मजा येणार आहे.

  धन्यवाद,

  अनंत

  0

  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   पुढच्या भागातून याचा खुलासा होणारच आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *