नंदराव! तसे बघितले प्रत्येक गावातल्या गल्ली बोळात एक ‘आंद्या’ असतोच हा तसलाच एक, पण हा स्वत:ला ‘आनंदराव’ असे म्हणवून घेत होता! या आनंदरावाने माझी माहीती कोठून मिळवली कोणास ठाऊक पण एके दिवशी असाच आधी काही न कळवता,  अपॉईंटमेंट न  घेता , एकदम दारात उभा! खरे तर अशा अचानक टपकणार्‍या जातकां बद्दल मी फार उत्साही नसतो, म्हणजे अशा जातकांना सर्व्हीस देत नाही असे नाही पण कोणालाही भेटण्यापूर्वी त्याची पत्रिका बनवणे, किमान प्राथमिक का होईना अभ्यास करणे महत्वाचे असते, तो झाल्या शिवाय जातकाशी बोलण्यात काही अर्थ नसतो.  पण त्या दिवशी जरा मोकळा वेळ होता म्हणून या आनंदरावाची दखल घेतली.


या आनंदरावांचा प्रश्न होता ‘एमपेश्शी युपेश्शी’ होईल का?

मला कळेना हे ‘एमपेश्शी युपेश्शी’ काय आहे? तसे विचारल्या वर आनंदरावाने खुलासा केला ..

“अहो ते नै का परीक्षा घेऊन भारीतली सरकारी नोकरी देल्याल ते”

आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला! या आनंदरावाला ‘MPSC / UPSC’ म्हणायचे आहे!  तसे ‘एमपेश्शी युपेश्शी’ शब्द काही वाईट नाही , मस्त तालबद्द आहे!  

आनंदरावाची पत्रिका केली, एक वरवरची नजर टाकली तरी कळत होते हे एक बुजगावणे आहे ! सरकारी नोकरीची शक्यता जवळजवळ नव्हतीच, पत्रिकेतले ग्रहमान पाहता सरकारी नोकरीचा नाद सोडून इतर काही क्षेत्रांत लक्ष दिले तर जरा वेगळ्या प्रकाराचे करियर (शेतकी औजारे, दुग्ध व्यवसाय , पशुपालन , खते-बि बियाणें इ.) आनंदरावाला नक्कीच लाभदायक ठरु शकेल. आनंदरावाला हे सारे समजाऊन सांगण्यापूर्वी त्याच्याशी बोलून जरा ब्यॅकग्राऊंड समजून घ्यावी म्हणून काही प्रश्न विचारायचे ठरवले.

“ ‘MPSC / UPSC’ म्हणजे जंगी परिक्षा भाऊ,  काय काय तयारी चालू  आहे?”

“हो ना राव, चार वर्षे झाली घासतोय ना!”

“अजून जमले नाही?”

“हॅ, पहील्या परिक्षेलाच विकेट पडतीय राव, ते जमले तर दुसरी परिक्षा द्यायची मग त्यानंतर इंटरव्हू ला बोलावत्यात,  …काय जमेल असे वाटत नाही”

“आनंदराव, हे MPSC / UPSC’ जरा अवघड प्रकरण असते”

“हो ना राव, चार वर्षे झाली ट्राय मारतोय , मारतोय पण काही होईना झालेय, काहीतरी जालीम तोडगा सुचवा, पण एकदाचे हे ‘एमपेश्शी युपेश्शी’ चा जुगाड चालवा गुरुजी , एकदम जंक्शन तोडगा टाका, पहील्या झटक्यात काम झाले पाहीजे”

“बाप रे, इतक्या झटपट ? कठीण आहे हो आनंदराव”

“असू म्हणू नका गुरुजी, काय होईल तो खर्च करु, आपली फुल्ल तयारी आहे, वाटले तर जमीन विकून पैसे उभे करतो, पण काम झाले पाहीजे”

(म्हणजे पत्रिका बरोबर सांगत होती! या आनंदरावा कडे जमीन जुमला आहे म्हणायचा!)

“अहो पण MPSC / UPSC च का? दुसरे ही काही चांगले पर्याय आहेत ना”

“नाय, आपल्याला फकस्त ‘‘एमपेश्शी युपेश्शी’‘ पायजे”

“मान्य, आपल्याला फक्त MPSC / UPSC मध्येच इंटरेष्ट आहे आणि तुम्ही म्हणाताय तसे गेली तीन-चार वर्षे त्यासाठी प्रयत्न करताय आणि हे करण्याच्या नादात तुम्ही दुसरे काही केले नाही, इतर कोणतेही प्रयत्न केले नाहीत . बरोबर ना?”

“हो”

“आता तुमच्या वयाच्या हिशेबा नुसार, अजून किती वर्षे आपल्याला MPSC / UPSC चे प्रयत्न करता येतील?”

“अजून दोन वर्षे”

“इतके करुनही MPSC / UPSC  नाही जमले तर काय? “

“सगळा अंधार!”

“असे का म्हणता? सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळेलच असे नाही, प्रायव्हेट सेकटर मध्ये पण चांगल्या संधी उपलब्ध आहेत, मी स्वत: पण बरीच वर्षे प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम केले आहे, मी इंजिनियर झालो त्याच वर्षी मला सरकारी नोकरी मिळाली होती पण मी ती नाकारुन प्रायव्हेट सेक्टर ला जॉईन झालो, चांगला निर्णय ठरला तो. तुमच्याही बाबतीत असे काही होऊ शकते, MPSC / UPSC च्या नादात काही चांगल्या संधीं कडे दुर्लक्ष होत आहे असे नाही का वाटत तुम्हाला?”

“तसे असेल गुरुजी , पण आपल्याला सरकारी नोकरीच पायजे आणि ती पण ‘एमपेश्शी युपेश्शी’ वाली पाह्यजे!”

“MPSC / UPSC चा इतका अट्टाहास म्हणजे  काही तरी ठोस कारण असणार, मला कळू शकेल का? म्हणजे त्या अंगाने आपली पत्रिका मला तपासता येईल“

“संगीता , संगीता,  संगीता !”

“आता हे ‘संगीता’ काय?”

“आपल लव हाये तिच्यावर”

“काय करतात ह्या संगीता”

“यफ वाय बी ये”

“एफ वाय बी ए म्हणजे वयाने लहान वाटतात”

“लहान कसली, मोठ्ठीच आहे, त्याचे काय झाले, धाव्वीला सहा वेळा आणि बाराव्वीला तीन वेळा फ्येल झाली, नंतर मध्ये चार वर्षे नुसते घरात बसून काहाडले, म्हणून आज यफ वाय बी ये त दिसतेय, मोठीच आहे”

“ठीक आहे, या ‘संगीता’ वर तुमचे प्रेम आहे म्हणता, असू दे ना,  पण त्याचा या MPSC / UPSC शी संबंध कसा?”

“ ‘संगी’ चा संबंध नाय पण तिच्या बापाचा आहे ना!”

“आता तो कसा काय?”

“त्याचे काय आत्ताची माझी नोकरी संगी ला चालतेय तिची काय तक्रार नाय, पण तिच्या बापाला जावई सर्कारी नोकरीतलाच ते पण क्लास वन गॅजेटेड का काय म्हणतात ना तसला पायजे, तसा हटूनच बसलाय तो”

“अच्छा, म्हणजे संगीता मिळावी म्हणून तुमचा ‘सरकारी’ नोकरी तीही क्लास वन गॅझेटेड साठी इतका आटापीटा चाललाय!”

 “तर काय, संगी आहेच तशी, तिच्या साठी काय पण..”

“वारे पठ्ठ्या, काय हो आनंदराव, तुमचे शिक्षण काय झाले आहे?”

“बी.ए.”

“कोणत्या विषयात?”

“अर्थशास्त्र”

“मस्त! एकदम भारी विषय आहे, डिमांड मध्ये आहे सध्या”

“कसली डिमांड, साला कोण नोकरी देत नाय, शेवटी एका ट्रॅव्हल कंपनीत बुकिंग क्लार्क म्हणून चिकटलो”

“असे कसे, डिमांड नाही असे होणारच नाही, सध्या सगळ्या इकॉनॉमिक्स वाल्यांना अच्छे दिन आलेत. नोटबंदी काय, GST काय, सगळी कडे धमाल चर्चा, टिव्ही चॅनेल, पेपर, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप सगळी कडे हे ईकॉनॉमिक्स वाले मोकाट सुटलेत”

“आपण त्यातले नाय बॉ”

“असे कसे म्हणता? तुम्ही बी.ए. ईकॉनॉमिक्स, तुमचा खास अभ्यासाच विषय म्हणून विचारतो, हे GST नेमके प्रकरण आहे तरी काय? आणि त्याचा आपल्या देशाच्या अर्थ व्यवस्थेवर काय परिणाम होणार – चांगला का वाईट? “

“मोदी सर्कार चा कायतरी टॅक्स आहे म्हणतात, लोकं , व्यापारी लय कावलेत, आता ह्यो मोदी जाणार बघा बाराच्या भावात”

 “आनंदराव , अहो उद्या तुमचे बी.ए. ईकॉनॉमिक्स क्वालिफिकेशन बघून त्या MPSC / UPSC  वाल्यांनी इंटरव्हू ला GST बद्दलचा प्रश्न विचारलात तर हेच उत्तर देणार का? अशी उत्तरें दिली तर मग पास कसे होणार तुम्ही MPSC / UPSC?”

“असे कसे होईल? इंटरव्हू चे कॉल लेटर आले की लागणार ना तैयारीला”

“उत्तम ! पण अशी तहान लागली की विहीर खणायला घेऊन कसे काय जमणार हो? मग चार वर्षे अभ्यास केला म्हणजे नेमके काय केलेत हो? ”

“तसे जास्त काही नाही , वेळच मिळेना झालाय , फेशबुक , व्हॉटसॅप चा लोड असतो ना”

“भलतेच बिझी दिसता राव तुम्ही, बरोबर आहे मग कसा अभ्यास होणार!”

“अभ्यास जमेना झाला म्हणून तर तुमच्या कडे आलो ना, काहीतरी आसलच ना तोडगा ? पण झटपट इफेक्ट देणारा सांगा, नाय तर काय होयाचे, इकडे मी तोडगा करत बसायचो आणि तिकडे संगी चा बा तिचे लग्न दुसरी कडे लावून द्यायचा, मधल्या मध्ये माझा पोपट व्हायचा”

“हे पहा आपली पत्रिका तपासल्यावर असे दिसते की क्लास वन गॅझेटेड सरकारी नोकरी मिळण्याचे जरा अवघड आहे”

“अहो असे कसे म्हणता, आसल आसल, कोणच्यातरी पोथीत लिहलेले असणार बघा, माझे कागदावर नाव आनंद असतेय पण माझे पाळण्यातले नाव ‘पांडुरंग’ आहे, त्या नावा वरुन बघा, काहीतरी वाट निघेलच की”

“आस्सं, बघुया, ‘पांडुरंग’ नावाने काही दिसतेय का ते..”

मी पत्रिका पुन्हा एकादा तपासली आणि म्हणालो..

“आनंदराव, आहे एक तोडगा आहे!”

“काय सांगता?”

“येस, एक तोडगा आहे, आपल्याला फक्त एक पोथी वाचायला लागेल, अगदी मनोभावे”

“एव्हढेच ना, झाले म्हणून समजा”

“ते इतके सोपे नाही ते म्हाराजा”

“का”’
“त्याचे असे आहे, पोथी वाचायचे काही नियम आहेत त्याप्रमाणेच ती वाचायची तरच तुमचे काम होणार नाही तर नाही”

“सगळे जमवू आपण, तुम्ही फकस्त सांगा काय काय करायचे ते”

“रोज पहाटे चार च्या सुमारास ऊठायचे, गार पाण्याचे अंघोळ करायची, आणि तसेच ओल्या कपड्या सहीत देवा समोर निरांजन लावून पोथी वाचायची, एकाच बैठकीत वाचायची, मध्ये अजिबात उठायचे नाही की कोणाशी बोलायचे नाही, फोन स्विच्ड ऑफ ठेवायचा, कळले?”

“चालतयं की”

“ओ राणा, इतके सोपे नाही ते, पोथी तशी लहान आहे पण एकाच बैठकीत ती २१ वेळा वाचायची असते, त्याला हिशेबाने साधारण तीन – साडे तीन तास लागतात”

“साडे तीन तास?”

“हां, साडे तीन तास, ओलेल्याने बसायचे असते, जमेल?”

“जमवू कसे तरी, आपण म्हणालो ना संगी साठी काय पण..”

“थांबा, अजुन माझे सांगून झाले नाही”

“अजून काय करायचे असते का?”

“हो तर, हे पोथी वाचायचे काम सलग १०८ दिवस, म्हणजे सुमारे साडे तीन महीने चालू ठेवायचे आहे, एक दिवस ही खंड पडू द्यायचा नाही, कळले?”

“बा भौ, हा भाग जरा अवघड आहे”

“तुम्हीच म्हणताय ना ‘संगी साठी काय पण…’ आता का?”

 “हा करणार ना, तुम्ही सांगीतलेले सगळे करणार, जमवतो कसे तरी, पण एखाद्या दिवशी नाय जमले तर?”

“असे होऊ देऊ नका , पण दुर्दैवाने खंड पडला तर देवीची माफी मागून पुन्हा पहिल्या पासुन सुरवात करुन १०८ दिवस पोथी वाचायची!”

“परत पहिल्या पासुन?”

“हो, एकदम जालिम तोडगा आहे ना”

“ही अट फार कडक आहे राव!”

“आता जालिम तोडगा आहे म्हणल्यावर त्याचे नियम-अटीं पण कडक असणार नाही का?”

“हां , ते पण बराबर हाय “

“मग करणार हा तोडगा?”

“दुसरा कोणता सोप्पा तोडगा नाय का?

“आनंदराव, तुम्हाला क्लास वन गॅझेटेड सरकारी नोकरी पाहीजे ती पण झटपट मग उपाय तोडगा सोप्पा कसा असणार ना?
“तरी पण…”

“आनंदराव आता कच खाऊ नका नाहीतर संगीताचे लग्न तिचा बाप दुसर्‍याशी लावून देईल! बघा बुवा”

“नाय नाय , करतो , हा तोडगा करतो की नाही बघा”

“शाब्बास आनंदराव, पण थांबा जरा… तुम्हाला अजून असे वाटते की असली एखादी पोथी वाचून सरकारी नोकरी मिळेल?”

“ऑ?”

“ह्या तोडग्या साठी तुमची पहाटे चार वाजता उठून , गार पाण्याने अंघोळ करायची  तयारी आहे, एका जागी बसुन सलग साडे तीन तास पोथी वाचायची तयारी आहे , आणि हे सगळे हे सगळे विनाखंड , सलग १०८ दिवस करणार आहात, बरोबर?”

“आता तोडगाच असा असेल तर करायला पाहीजे ना?”

“पण हे असे करण्याची तुमची फुल्ल तयारी आहे मग चार वाजता उठून , एका जागी बसून , सलग तीन तास , १०८ दिवस , तुम्ही MPSC / UPSC चा अभ्यास का करत नाही?”

“अभ्यास?”

“हो, परिक्षेत यश मिळवायचे तर अभ्यास नको करायला, पोथी वाचण्यात तीन तास घालवण्या पेक्षा अभ्यास केला तर यश मिळायची शक्यता जास्त आहे ना?”

“पण अभ्यास करुन यश मिळाले नाही ना?”

“असल्या शंका आधीपासुनच का घेता? प्रयत्न केलाय का कधी? अभ्यास केला का कधी ?  स्पष्ट बोलतो, तुम्ही तीन- चार प्रयत्न करुन सुद्धा प्राथमिक टप्पा सुद्धा पार करु शकला नाही ह्यातच हे स्पष्ट होते की एकतर तुमचा अभ्यास खूप कमी पडत आहे किंवा तुमच्या नशिबात असल्या नोकरीचे योग नाहीत”

“तोडगा केला की मिळणार नाही का नोकरी….”

“असे उपाय तोडगे करुन , घरबसल्या नोकर्‍या मिळत असत्या तर कोणी शाळा – कॉलेजात गेलेच नसते”

“सगळे प्रयत्न केले काही झाले नाही म्हणून तर तोडगा करतो ना माणूस?”

“सगळे प्रयत्न केले असे तुम्ही म्हणताय पण वस्तुस्थिती वेगळीच आहे, तुम्ही एकतर प्रयत्न केलेच नाही किंवा चुकीच्या दिशेने केले असे म्हणता येईल. मघाशी मी तुम्हाला मुद्दामच GST बद्दलचा प्रश्न विचारला होता, त्याला तुम्ही काय उत्तर दिले? ‘मोदी सर्कार चा कायतरी टॅक्स आहे म्हणतात’ ते उत्तरच सांगतेय की तुमचा काहीही अभ्यास नाही, अर्थशास्त्र शिकलात ना तुम्ही मग त्यातले काय येते तुम्हाला? शिता वरुन भाताची परिक्षा!”

“मग आता काय करायचे”

“आता ते काय वेगळे सांगायचे काय?”

“ते अभ्यासाचे कसे काय जमणार?”

“ते तुमचे तुम्ही बघा”

“ती पोथी कोणती ते तरी सांगा,  एक ट्राय मारतो”

“कसली पोथी? अशी कोणती पोथी नाही, खोटे होते ते सगळे. मला फक्त हेच सांगायचे होते की ह्या असल्या भाकड उपाय – तोडग्यांच्या नादात वेळ, पैसा, शक्ति खर्च करण्या पेक्षा , प्रयत्न करा , मेहेनत करा आणि ते प्रयत्न कोणते – कसे- कधी- कोणत्या दिशेने हे पत्रिकेच्या माध्यमातून समजून घ्या. तुमची पत्रिका सरकारी नोकरी साठी फारशी अनूकूल नाही, तुमची खरी ताकद दुसर्‍याच क्षेत्रात आहे , तिथे प्रयत्न केलेत तर तुम्हाला जास्त चांगले यश मिळेल आणि तुमचे आयुष्य जास्त सुखा समाधानाचे जाईल, पण तुम्ही ते ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाहीत त्याला आता काय करायचे!”

“ते ठीक असेल हो पण सरकारी नोकरी नसेल संगी चा बाप तैयार नाही होणार!”

“असला प्रश्न लैला – मजनु ला पडला, हीर – रांझा ला पडला नाही, सोहनी – महिवाल ला पड्ला नाही, वासु – सपनाला पडला नाही, आर्ची – परश्या ला पण पड्ला नाही !”

“अहो ती शिनेमातली उदाहरणे सांगताय”

“म्हणून काय, ज्यांचे प्रेम सच्चे असते ते सगळ्या जगाचा विरोध असला तरी लग्न करुन मोकळे होतात, संगीताच्या बापाचे काय घेऊन बसलात”

“लै डेंजर आहे “

“काय?”

“संगी चा बाप”

“आता हा तुमचा प्रॉब्लेम, तो तुमचा तुम्हीच सोडवायचा”

 “म्हणजे तुम्ही उपाय – तोडगे सांगणार नाही”

“नाही”

“मग तुम्ही कसले ज्योतिषी म्हणायचे”

“पत्रिकेचा अभ्यास करुन सांगणारा”

“पण त्याने माझे ‘एमपेश्शी युपेश्शी’‘ होणार नाही”

“नाहीच होणार, अभ्यास तुम्हालाच करायचा असतो“

“ते अभ्यास आमच्या बाच्याने जमणार नाय, आपल्याला जालिम तोडगा सांगणार पाह्यजे”

“मी त्यातला नाही” 

“मग उगाच तुमच्या कडे आलो”

“धन्यवाद आणि शुभेच्छा”

 

समाप्त

शुभं भवतु

 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. अण्णासाहेब गलांडे

  छान छान,पण यात शेवटी मानधन घेतल्याचा उल्लेख नाही!तेवढ राहीलं बघा!!☺

  0

  1. सुहास गोखले

   श्री अण्णासाहेब,

   अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

   या आनंदरावा कडून काही मानधन घेतले नाही (आणि त्याने ही द्यायची तयारी दाखवली नव्हती) , मुळात त्याला भविष्य पाहायचे नव्हतेच त्याला उपाय – तोडगे करुन घरबसल्या सरकारी नोकरी ती सुद्धा क्लास वन गॅझेटेड अशी हवी होती. मला हे अगदी सुरवातीलाच कळले होते , खरे तर उपाय तोडग्याची मागणी करणार्‍यांना मी लगेचच “मी उपाय तोडगे सांगत नाही आपण चुकीच्या जागी आला आहात . कृपया आपण दुसर्‍या कोणाला तरी विचार’ असे सांगून कटवतो. या आनंदरावाला जरा काही समजाऊन सांगावे म्हणून इतका वेळ त्याच्याशी बोललो. अर्थात मी त्याला भविष्य म्हणजे ,फक्त सरकारी नोकरीचे योग नाहीत पण इतर क्षेत्रात चांगल्या संधी आहेत.. असे सांगीतले होते याचे मानधन मला नक्की घेता आले असते पण ते आनंदरावाच्या मुळ प्रश्नाचे उत्तर नव्हते तर मी पुरवलेली अनाहूत माहीती होती असे आनंदरावाला वाटले असणार.

   काहीवेळा आपला वेळ, पैसा, मेहनत अशी ‘अक्कलखाती’ जमा करावी लागते !

   सुहास गोखले

   1+

 2. अण्णासाहेब गलांडे

  उत्तर आवडले, पटले.खूप खूप धन्यवाद.

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *