तुम्ही कोणताही व्यवसाय करत असा, कोणतीही सेवा पुरवत असा, पैसे घेऊन (मानधन म्हणा) किंवा विनाशुल्क. अनेक प्रकारचे लोक्स भेटतात.

बाहेरचे लोक म्हणजे जे माझे नातेवाईक नाहीत, मित्र परीवारातले नाहीत , ओळखीचे नाहीत त्यांच्या बाबतीत’ प्रश्न – कोटेशन- मानधन- रिपोर्ट’ असा सरळ सोपा व्यवहार होऊन जातो. पण नातेवाईक , मित्र , ओळखीचे यांच्या बाबतीत मात्र कात्रीत सापडल्या सारखे होते. हा मित्र आहे , तो नातेवाईक आहे , यांची जुनी ओळख आहे , यांच्या कडून कसले पैसे घ्यायचे असा माझा भिडस्त स्वभाव. हे सगळे जो पर्यंत ‘थोडक्यात गोडी’ अशा स्वरुपात असते तो पर्यंत ठीक पण काही वेळा हेच जवळचे , आप्तस्वकीय माझ्या भिडस्त स्वभावाचा गैरफायदा घ्यायला सुरवात करतात, तेव्हा मात्र चिडायला होते.

‘एखादा प्रश्न विचारला,उत्तर दिले’ असे  थोडक्यात आटोपले तर  काहीच हरकत नाही पण हे प्रश्न विचारणे थांबतच नाही  आता सगळे अशा टप्प्यावर येऊन पोहोचते की  धड पैसे ही मागता येत नाही आणि काम नाकारता पण येत नाही . बरे , इतके सगळे करुन , शेवटी पदरात काय पडते .. काहीही नाही.. ज्यांना चार- पाच  तास पत्रिकेचा अभ्यास करुन भविष्य मागर्दर्शन केले त्यांना एक औपचारिकता म्हणून साधे ‘थँक्यू’ सुद्धा म्हणावेसे वाटत नाही? मी पैसे घेतले नाहीत हे खरे पण या लोकांना इतर कोणत्या मार्गाने त्याची परतफेड करता येतेच ना , पण माझ्या बाबतीत हे पण झाले नाही. लांबचे कशाला माझ्या एका अगदी जवळच्या नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नाचे भविष्य (फुकट सांगीतलेले होते हे ओघानेच आले) अगदी अचूक बरोबर आले तरी त्यांना साधा फोन करुन सांगावेसे वाटले नाही.

आज मी एका अशाच एका कृतघ्न जातकाबद्दल लिहणार आहे , खरे तर हे लिहावे का ? हा प्रश्न माझ्या मनात गेले काही महीने घोळत होता, लेख लिहून तयार असला तरी मी तो प्रकाशीत केला नव्हता. शेवटी ठरवले, याला एकदा वाचा फोडलीच पाहीजे.

हा जातक तसा माझ्या मित्र, त्याचा प्रश्न होता ‘मुलाचे लग्न कधी?” आता हा मुलगा होता अवघा २४ वर्षाचा , तसे पाहीले तर आजच्या काळात मुले इतक्या लहान वयात लग्नाला तयार पण  होत नाहीत, पण यांना कमालीची गडबड झाली होती, मला ही जरा आश्चर्यच वाटले .मी त्यांना सुचवले की इतकी गडबड करायची आवश्यकता नाही , मुलगा इंजिनियर आहे , चांगल्या कंपनीत नोकरीस आहे, स्वत:चे एक नाही चक्क दोन फ्लॅट्स (दोन्ही दोन बेडरुमचे )आहेत , मुलगा दिसायला बरा आहे , एकुलता एक आहे , अगदी आदर्श परिस्थिती म्हणतात तशी. ह्याच्या लग्नाला वेळ लागणार नाही, अगदी म्हणाल तेव्हा लग्न होईल. ज्योतिषाला प्रश्न विचारण्या इतकी वेळ अजून तरी आलेली नाही.

लग्नाची जरा जास्तच गडबड होते आहे , अजून दोन – तीन वर्षे हातात आहेत त्याचा जास्तीतजास्त लाभ उठवून , पुढचे शिक्षण घेता येईल, मॅनेजमेंट मधली एखादी पदवी मिळवता येईल ज्याचा पुढे करीयर मध्ये कमालीचा उपयोग होईल, पुढचे शिक्षण मनात नसेल तर किमान थोडी बचत करुन आर्थिक पाया मजबूत करुन घ्या, तब्बेती कडे लक्ष देता येईल, एखादा छंद , आवड , कला जोपासता येईल. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विवाह या मधली काही तीन – चार वर्षे असतात त्याच काळात हे होऊ शकते , एकदा का विवाह झाला की हे सगळे करायला वेळ मिळत नाही, शिक्षणाचे , तब्बेत कमवायचे एक वय असते ते एकदा का उलटून गेले की मग या गोष्टी अवघड बनत जातात. आज ‘विवाहाची स्वप्ने गोड दिसली तरी त्या मोहापायी आयुष्याची भक्कम उभारणी करण्याची इतकी अनुकूल संधी समोर आहे ती लाथाडणे योग्य ठरणार नाही.

पण त्या दोघांनाही हे काही एक पटले नाही, लग्न एके लग्न , एखादी तिशी ओलांडलेली अविवाहीत व्यक्ती जितकी विवाहा बद्दल काळजी करणार नाही त्यापेक्षा जास्त काळजी या दोघा बाप-लेकांचा चेहेर्‍यावर दिसत होती. कदाचीत या मागे काही आर्थिक गणिते असावीत असा मी अंदाज केला कारण मुलासाठी नुकताच एक अपार्ट्मेंट घेतले होते त्याचा भला भक्कम हप्ता भरावा लागत होता,  आधीच्या अपार्टमेंटचे हप्ते ही चालू होतेच तेव्हा आणखी एक मिळवता हात मिळाला तर कर्जाचे हप्ते फेडणे हलके जाईल असा विचार त्या मागे असावा. ‘नोकरी करणारीच’ अशी ठाम अट हे दोघे घालून राहीले होते ते बहुदा या कारणा साठीच असावे.

असो, तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आणि मी बाहेरचा माणुस याहुन जास्त काय बोलणार, त्यांचे ते बघून घेतील म्हणून मी तो विषय तेवढ्या वरच थांबवला. माझ्या मगदूराप्रमाणे त्या मुलाच्या विवाहा साठीचा कालवधी कोणता असेल याचा अंदाज त्यांना दिला , मला वाटले झाले! पण नाही…

हा फुकटचा उस जातकाला भलताच गोड लागला असावा, मग काय त्याने तो अगदी मुळा पासुनच खायचा ठरवला !

आता जातकाचे प्रश्न सुरु झाले :

1. जातकाचा स्वत:चा नोकरीचा प्रश्न
2. मुलाच्या नोकरीचा प्रश्न
3. बायकोच्या तब्बतेचा प्रश्न
4. सासुच्या तब्बतेचा प्रश्न

मला पार सोलूचच काढला म्हणायचा , जाऊ दे मित्र आहे , म्हणून मी फुकट सेवा पुरवत राहीलो… खरेतर कॉलेजातली दोन एक वर्षे आम्ही एकत्र होतो , त्यानंतर आमच्या वाटा अलग झाल्या होत्या, सुमारे पंचवीस वर्षे आमचा कोणताही संपर्क नव्हता (जो नंतर फेसबुक च्या माध्यमातून अचानक झाला !) ,  ‘ना जान ना पेहेचान मै तेरा मेहेमान ‘ अशातली गत होती. तरी देखील जुन्या आठवणीं म्हणून मी माझी पूर्ण व्यावसायीक सेवा विनामूल्य पुरवत होतो. प्रकरण इतक्यावरच थांबले असते तरी चालले असते पण तसे व्हायचे नव्हते ना !

आता मुला साठी स्थळे बघायला सुरवात झाली , ‘अनुरुप ‘ मध्ये जरा बरी कन्या दिसली की लगेच पत्रिका जुळते का ते पाहावया साठी माझ्याकडे पाठवायचा सपाटा सुरु झाला …

पत्रिका मेलन .. १
पत्रिका मेलन .. २
पत्रिका मेलन .. ३
पत्रिका मेलन .. ४
पत्रिका मेलन .. ५
पत्रिका मेलन .. ६
पत्रिका मेलन .. ७
पत्रिका मेलन .. ८
पत्रिका मेलन .. ९
पत्रिका मेलन .. १०
पत्रिका मेलन .. ११
पत्रिका मेलन .. १२
पत्रिका मेलन .. १३
पत्रिका मेलन .. १४
पत्रिका मेलन .. १५
पत्रिका मेलन .. १६
पत्रिका मेलन .. १७
पत्रिका मेलन .. १८
पत्रिका मेलन .. १९
पत्रिका मेलन .. २०
पत्रिका मेलन .. २१
पत्रिका मेलन .. २२
पत्रिका मेलन .. २३
पत्रिका मेलन .. २४
पत्रिका मेलन .. २५
पत्रिका मेलन .. २६

आता बोला ! हे सगळे फुकट हं ! याचे पूर्ण व्यावसायीक मूल्य होते  रुपये  २०,०००  फक्त !

बरे घाई इतकी की सकाळी ईमेल / एसेमेस ने पत्रिकेचे तपशील पाठवायचे आणि लगेच दुपारी दोन च्या सुमारास फोन करुन (हा वेळ त्याचा लंच टाइम असायचा, मला कॉल करायला सोयीचा ) ‘झाले का? झाले का? असा तगादा ! अरे जसा काही मी केवळ या माणसाचेच काम करायला रिकामा बसलो होतो कि याचा नोकर होतो.

हा किस्सा इतक्यात संपत नाही, पुढच्या भागात पूर्ण करतो..

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Omkar

  बापरे बाप, पट्ठ्याची कमाल आहे, आमची पणजी म्हणायची कि “निघतेय म्हणून गायीचं आचळ खेचून काढू नये.” मागे एका healthy मुलीचा एक एकतर्फी प्रेमाचा जबर किस्सा तुम्ही ब्लॉगवर टाकलेलात, असेच व यासारखे किस्से गमतीजमती वाचायला नक्की आवडतील. धन्यवाद

  0
  1. सुहास गोखले

   श्री. ओमकारजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. व्यवसाय म्हणले की नाना तर्‍हेचे लोक्स भेटतात. असे अनेक अनुभव आलेत मला, जसा वेळ मिळेल तसे लिहेन , वाचणारे कोणी असेल तर लिहायाला उत्साह असतो.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.