१९८७ , पुण्यातले एक प्रसिद्ध ज्योतिषी , नुसते प्रसिद्ध नव्हे तर हे ज्योतिषी त्याकाळचे एक बडे प्रस्थ होते. मी त्यावेळी ज्योतिष हा एक छंद म्हणून जोपासत होतो त्यामुळे वेगवेगळ्या ज्योतिषांना या ना त्या कारणांमुळे भेटणे चालू होते. या बड्या ज्योतिषीबुवांना भेटायचे ठरवले , ज्योतिषी बडे प्रस्थ असल्याने भलतेच बिझी ! जातक म्हणून रितसर अपॉईंटमेंट घ्यावी लागली.
भविष्य विचारायला येणार्या व्यक्तीला ‘जातक’ म्हणायचे बरे का … गिर्हाईक नाही.. बकरा तर अजिबात म्हणायचे नाही..सांगून ठेवतो ! पण आताच्या काळात ‘जातक’ हा शब्द सुद्धा डाऊन-मार्केट झाला बर्का .. त्यापेक्षा ‘क्लायंट ‘ म्हणले की कसा एकदम अप-मार्केट फील येतो.
ठरल्या दिवशी ठरलेल्या वेळेच्या आधी सुमारे अर्धा तास मी त्या ज्योतिषांच्या कार्यालयात पोहोचलो. हे महाशय त्यावेळी पुण्यातल्या एका प्रख्यात आणि साक्षात लक्ष्मीचे वरदान लाभलेल्या एका प्रतिष्ठीत रस्त्यावर आपले कार्यालय थाटून बसलेले होते. रस्ता (किंवा पत्ता) प्रतिष्ठीत असला तरी कार्यालय ज्या इमारती मध्ये होते ती एक जुनाट , मोडकळीला आलेली चाळ होती. एक प्रकाराचा कुबट वास सर्वत्र भरुन राहीलेला होता. फळ्या तुटलेला , लटपटत्या पायर्यांचा जिना, जागोजागी पान / मावा (१२०-३०० वाला!) खाऊन पचपचा थुंकून सडेच्या सडे घातलेले होते .
गुटखा तेव्हा फारसा माहीती नव्हता लोकांना… नुकती कोठे ‘प्रिन्स का गुट्ख्या’ ची जाहीरात दिसायला सुरवात झाली होती आणि पाठोपाठ ‘पानपराग’ बस्स… असली हीरो ‘माणिकचंद’ आणि ‘गोवा’ नंतर बर्याच वर्षांनी हीट्ट झाले ! काय झमाना होता नै !
ते मंगलमयी सडे आणि घाणीचे ढिगारे चुकवत मी एकदाचा दुसर्या मजल्यावरच्या कार्यालयात पोहोचलो. हे कार्यालय पण तितकेच कळकट होते, ‘चप्पल –बूट बाहेर काढून आत या’ अशी सक्ती असल्याने नाईलाजाने बूट काढले आणि धुळीत पाय भरवून घेत आत गेलो , साधा केर सुद्धा काढलेला दिसत नव्हता,
बाकी त्या खोलीचे वर्णन काय करु.. … सर्वत्र पोपडे धरलेल्या भिंतींवर जळमटें लोंबत होती. एका भिंतीवर अनेक जीर्ण झालेले फोटो कसेही वेडे वाकडे टांगले होते.. एका कोपर्यात शेवाळे धरलेला केविलवाणा मटका आ वासून बसला होता. दुसर्या कोपर्यात एका लाकडी स्टूलावर कसलीशी गोणी ठेवली होती तीला मुंग्या लागलेल्या दिसत होत्या. एका भिंतीवर दोन वेड्यावाकड्या फळ्या ठोकल्या होत्या त्यावर पिवळ्या पडलेल्या कागदांचे गठ्ठेच्या गठ्ठे होते. खोलीच्या एका बाजूला बाल्कनी , पण तिथे मोडक्या तोडक्या फनिर्चरचा ढीग लावून ठेवला होता.
आत बसायला एक हेअर कटींग सलून मध्ये असते तसे एक बाकडं होते , त्यात ढेकूण होते ! अर्थात हे नंतर घरी परतल्या नंतर लक्षात आले !!
समोर एका छोट्या टेबलाशी पार्ट टाईम जॉब करणारी मालन / शालन / छाया / संगीता टाईप रेसेप्शनीष्ट होती ..
मी आत आल्याचे तिच्या लक्षातही आले नाही कारण ती एका पुस्तकात डोके खुपसून बसली होती. बराच वेळ गेला तिने माझ्या कडे लक्षच दिले नाही . शेवटी मलाच ‘शुक शुक ‘ करावे लागले !
“ओ शुक शुक काय करताय ?”
“मग काय शिट्टी वाजवू ? तुमचे लक्ष नाही मग आम्ही करायचे काय ?”
“काय हवय ?”
“हे कसले दुकान आहे ?”
“अहो हे दुकान नाही , हे XXXX चे ऑफिस आहे “
“ मला माहीतेय .. माझी आता अपॉईंटमेंट आहे म्हणून आलोय ..”
“मग तसे सांगा ना?”
“आता तुम्ही ‘ काय हवय” असे विचारल्यावर मी तरी दुसरे काय बोलणार ..”
मारक्या म्हशी सारखे माझ्याकडे बघत छायाने (संगीता असेल कदाचित) ड्रॉवर मधून एक कळकट , शाळेतली मुले वापरतात तसली एक चतकोर आकाराची वही काढली ..वहीची पाने चाळत म्हणाली…
“गोखले का?”
“हो..”
“५१ रुपये भरायचे , वरचा एक रुपया सुट्टा द्यायचा ..”
मला कल्पना होतीच , पन्नासची एक नोट आणि वर एक डॉलर तिच्या समोर ठेवला .छायाने मग ड्रॉवर मधून पत्राचा एक ड्ब्बा काढला व पैसे त्यात ठेवले ..वहीत लिहलेले माझे नाव खोडले.. मग छायाने तिच्या मागच्या भिंतीवर दोन वेळा थाप मारली !
मी छायाच्या या कृतीकडे विस्मयाने पाहातच राहीलो , छायाच्या लक्षात आले बहुदा..
“सांगीतलेय सरांना, बसून घ्या , सर बोलावतील”
पुढची दहा बारा मिनिटें भयाण गेली, ती छाया परत पुस्तक वाचण्यात मग्न झाली, मी घाम पुसत अस्वस्थपणे ते ज्योतिषी बुवा केव्हा बोलवतात याची वाट पहात होतो. कहर म्हणजे या बाहेरच्या खोलीत पंखा नव्हता , कमालीचे उकडत होते आणि भरीस तो भरुन राहीलेला कुबट वास ! हा वास अर्थातच त्या आख्ख्या चाळ नामक बांधकामातच भरुन राहीला होता, त्याला तो ज्योतिषीबुवा तरी काय करणार म्हणा ! छाया ला त्याची सवय झालेली असावी कारण ती त्या उकाड्यात ही मन लावून पुस्तक वाचत होती. प्रथम मला वाटले , कॉलेज चा अभ्यास किंवा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असेल बिचारी , वेळेचा सदुपयोग ! पण कसचे काय , पुस्तकाचे पान बदलताना ती वाचत असलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ ओझरते असे दिसले.. बाबा कदमांची कादंबरी !
मग अचानक पुजेची घंटा वाजते तसा आवाज आला, चक्क पुजेची घंटाच वाजत होती ! छाया बसली होती तिच्या पाठी मागच्या भिंतीवर चक्क पुजेची घंटा टांगून ठेवली होती आणि तीला एक दोरी बांधलेली होती ( गैरसमज नको.. दोरी पुजेच्या घंटेला बांधलेली होती , छायाला नाही !) आणि ती खेचून कोणीतरी हा घंटानाद करत होते ! कोणीतरी नाही, हा त्या ज्योतिषीबुवांचाच उद्योग !
छायाने तीच्या पाठीमागे असलेत्या दरवाजा कम पार्टिशन कडे बोट दाखवले..
“ओ , जा आत , सर बोलावतात तुम्हाला”
“नक्की का?”
“म्हणजे काय , घंटा वाजवतात ना ते”
ही अगदी लहान खोली (केबीन) , इथेही फारसा उत्साहवर्धक प्रकार नव्हता, कागदांचे ढीगच्या ढीग होते (हे कागद कसले होते ते सांगत नाही कारण ते सांगीतले तर हे ज्योतिषी महाराज कोण होते ते लगेच कळेल !) , धूळ , कचरा , कुबट वास , लोंबणारी जळमटें इथेही होतीच , भरीस एक कर्कश्य आवाज करणारा पंखा होता , त्या पंख्याच्या वार्याने कागद उडू नयेत म्हणून कागदांच्या प्रत्येक ढीगा वर काहीबाही वजन ठेवलेले होते. फुटकी कपबशी, लाकडाचे फळकूट, फरशी / विटांचे तुकडे, बूट , अल्युमीनचा गोल डब्बा … काहीही.
खोलीत एक छतातून खाली लोंबणारा, जळमट युक्त पिवळा पंचवीस वॅट चा बुल्लोक !
क्रमश:
शुभं भवतु
- गो फर्स्ट क्लास (Go First Class) ! - August 8, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ४ - July 2, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – ३ - July 1, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – २ - June 30, 2019
- मामाची इस्टेट ! भाग – १ - June 22, 2019
- ‘मान्सून धमाका’ सेल - June 10, 2019
- केस स्ट्डी: लाईट कधी येणार ? - June 9, 2019
- असे जातक येती – १३ - May 29, 2019
- माझे ध्यानाचे अनुभव – २ - April 29, 2019
- ज्योतिष शिकायचेय ? - April 26, 2019
Dear Suhasji,
Saprem Namaskar,
I somehow got an intuition that you will post something new today hence checked your site. Awaiting the subsequent posts on this interesting story.
Kalave lobh asava,
Aapla,
Prashant
श्री. प्रशांतजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद.
या स्टुरीचा दुसरा भाग लिहून तयार आहे , उद्या – परवा पोष्ट करतो.
सुहास गोखले
Suhas Ji
Now you are on track.
श्री. संदीपजी,
अभिप्राया बद्दल धन्यवाद. मध्यंतरी पुणे विद्यापीठाच्या परिक्षांसाठी परिक्षक म्हणून ड्युटी लागली होती , त्यात बराच वेळ जात होता . आता मोकळा झालोय .
सुहास गोखले
अरे बापरे… प्रतिथयश ज्योतिषांच ऑफिस इतकं भयाण?… चित्र डोळ्यासमोर उभे राहिले… छान वर्णन केले आहे.
सौ. माधुरीताई,
अभिप्राया बद्दल धन्यवाद,
मी जे वर्णन केले आहे ते शब्दश: खरे आहे. अहो याहुनही वाईट प्रकार बघितले आहेत. तुलनेत आजकालच्या काळात लॅपटॉप वापरणारे ज्योतिषी जरा बर्या स्थितीत आहेत म्हणायचे. ज्योतिषांचे काही चांगले , सात्वीक अनुभव ही आहेत माझ्याकडे तेही लिहीणार आहे .
सुहास गोखले